कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांचा गृहप्रकल्प स्वप्नवतच!, ठेकेदाराचे दुर्लक्ष
By तानाजी पोवार | Published: August 1, 2022 06:37 PM2022-08-01T18:37:17+5:302022-08-01T18:38:09+5:30
अवघी ३८० स्क्वेअर फुटांची घरे, आठ फूट उंची, गळके छप्पर, गिलावाची ढपले पडलेल्या भिंती, अशा पोलीस वसाहतीत अंधार कोठडीत पोलिसांची कुटुंबे जीवन जगत होती.
तानाजी पोवार
कोल्हापूर : जिल्ह्यातील १,२७८ पोलीस अंमलदारांना सुसज्ज व अद्ययावत घरे देण्याची शासनाने घोषणा केली, नव्या शासनानेही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले; पण बांधकाम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे १६७ घरांचा जुना बुधवार पेठेतील पोलिसांचा गृहप्रकल्प स्वप्नवतच राहणार काय? अशी स्थिती झाली. मार्च २०२१ पर्यंत तीन इमारतींचा हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत असताना फक्त दोनच इमारतींचे काम ७० टक्के झाले, तर तिसऱ्या इमारतीचा एकच स्लॅब झाला अन् काम रखडले आहे.
जिल्ह्यातील पोलीस वसाहती किमान शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. अवघी ३८० स्क्वेअर फुटांची घरे, आठ फूट उंची, गळके छप्पर, गिलावाची ढपले पडलेल्या भिंती, अशा पोलीस वसाहतीत अंधार कोठडीत पोलिसांची कुटुंबे जीवन जगत होती.
दिवसभर बंदोबस्तात कंटाळलेल्या पोलिसांना सुसज्ज घरे मिळावीत याच उद्देशाने पोलिसांच्या वसाहतीचे रूप पालटण्यासाठी शासनाने निधीही मंजूर केला. जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय, जुनी बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी, तसेच इचलकरंजी येथील जुन्या वसाहती पाडून तेथे नव्या गृहप्रकल्पाला मंजुरी दिली.
जुना बुधवार पेठेतील सुमारे १९ हजार स्क्वेअर फूट जागेत गृहप्रकल्पाच्या तीन इमारतीमध्ये १६७ फ्लॅटचे कामाला मंजुरी मिळाली. ठेकेदाराला दिलेली काम पूर्णत्वाची मुदत मार्च २०२२ ला संपली तरीही सहा आणि सात मजली इमारतीचे काम फक्त ७० टक्केच पूर्ण झाले, तर नऊ मजली इमारतीचा फक्त पहिलाच स्लॅब पडला आहे. त्यासाठी २८ कोटी निधीही दिला आहे. ही कामे सांगलीतील बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू असून, पोलीस हाउसिंग मंडळ, वरळी, मुंबई यांच्या आधिपत्याखाली कामे सुरू आहेत.
जिल्ह्यातील मंजूर पोलीस गृहप्रकल्पांची सद्य:स्थिती
- पोलीस मुख्यालय (मंजूर ६९७ घरे) : जुनी वसाहत पाडली, प्रकल्पाचे काम आठवड्यात सुरू होण्याची शक्यता.
- लक्ष्मीपुरी (मंजूर २०० घरे) : जुनी वसाहत पाडण्याचे काम सुरू.
- इचलकरंजी (मंजूर २१४ घरे) : तिसरा स्लॅबचे काम सुरू.
जुना बुधवार पेठेतील पोलीस गृहप्रकल्पाचे काम पोलीस हाउसिंग मंडळ मुंबईच्या आधिपत्याखाली सुरू आहे, ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे, त्याबाबत ठेकेदाराला हाउसिंग मंडळामार्फत नोटीस बजावली आहे. -शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा