परदेशी पोहोचलेलं ‘कलाट’ जिल्ह्यात अद्यापही दुर्लक्षित
By Admin | Published: January 28, 2017 10:36 PM2017-01-28T22:36:41+5:302017-01-28T22:36:41+5:30
रेठरेच्या कलाकाराची शोकांतिका : ७२ व्या वर्षीही वादनात तरबेज
नारायण सातपुते -- रेठरे बुद्रुक येथील रज्जाक बाबालाल आंबेकरी यांनी कलाट वादनाच्या माध्यमातून संगीतामधील जाणकारांना पुरेपूर आनंद दिला आहेच. त्याचबरोबर सर्वसामान्य रसिकांनाही त्यांनी या वाद्याची भुरळ पाडली आहे. मंदिरे, धार्मिक समारंभ किंवा लग्नकार्याप्रसंगी बँडमध्ये वाजवलं जाणारं कलाट हे वाद्य त्यांनी अक्षरश: प्रसिद्धीच्या झोतात आणलं आहे. शासनाच्या विविध कला महोत्सव ते देशभरात अनेक ठिकाणच्या महोत्सवात सहभागी होऊन त्यांनी कलेची चुणूक दाखवली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, सौराष्ट्र व अमेरिकेतही त्यांच्या वादनामधील कलाविष्काराच्या ध्वनिफित पोहोचल्या आहेत. आजकाल डीजे व डॉल्बीच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई रज्जाक आंबेकरी यांच्या कलाट वादनावेळी थोडीशी थांबताना दिसते. वयाच्या चौदाव्या वर्षी सुरू केलेले कलाट वादन वयाची ७२ वर्षे सरली तरी जसेच्या तसे ऐकायला मिळते. सुरेल आणि गोड कलाट वादक रज्जाक आंबेकरी शासनाच्या मानधनापासून मात्र वंचित आहेत.
पूर्वी जवळच्या कृष्णा नदीवर पूल नव्हता. त्यावेळी नावेतून प्रवास असायचा. ती नाव हाकणारी या गावातील आंबेकरी ही मंडळी. त्याच नावाड्यांच्या घरची पार्श्वभूमी असणारे रज्जाक आंबेकरी ऊर्फ रज्जाक मास्तर. वयाच्या दहाव्या वर्षी ते जलतरंग वादनात पारंगत होते. या अनुभवावर चौदाव्या वर्षी त्यांनी कलाट वादन आत्मसात केले. ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर बँड ही कला पोहोचवली त्या मिरज, जि. सांगली येथील बालेखान घराण्यामधील आसदखान यांच्याकडून ते ही कला शिकले. आज तब्बल ५९ वर्षे झाली तरी अव्यातहपणे व जसेच्या तसे ते कलाट वादन सादर करतात, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणतेही व्यसन अंगी न लावलेले रज्जाक मास्तर ठणठणीत दिसतात; पण उद्या वादन करणारे अवयव निकामी झाल्यास आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाचे कलाकार मानधनही त्यांना मिळत नाही. मात्र, हे यक्ष प्रश्न असले तरी रज्जाक मास्तरांनी कलाट वादन सुरूच ठेवले आहे. संगीतकार राम कदम, बंडोपंत, उषा चव्हाण यांच्या सहवासासह राज्यातील नामवंत लोकनाट्य तमाशाच्या पार्टीबरोबर त्यांनी आपली कला सादर केली आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सुखद प्रसंग सांगतात.
मराठी पिंजरा चित्रपटामधील दे रे कान्हा, सुवर्ण सुंदरी या हिंदी चित्रपटामधील कुहू..कुहू बोले कोयलया, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, ज्योत से ज्योत जगाते चलो यासह सुमारे शंभर गीतांचा त्यांचा हुबेहुब सराव आहे. ए मालिक तेरे बंदे हम या गाण्यावर दिवंगत जयवंतराव भोसले यांच्याकडून मिळालेली दाद त्यांना विशेष स्मरणात आहे.
कलाटला हवी राज्यमान्यता
पूर्वीची वाद्ये कमी झालीत. आज डीजेचा जमाना असल्यामुळे कलाट वादनावेळी पूर्वीइतका जोश व उत्साह येत नाही. यासाठी शासनाने या वादनास राजमान्यता द्यावी.
- रज्जाक आंबेकरी