गुडेवाडी येथील परशराम पाटील यांना नेहरू फेलोशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:21+5:302021-03-17T04:23:21+5:30
कोल्हापूर : गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशुराम जकाप्पा पाटील यांची नवी दिल्लीतील नेहरू मेमोरियल लायब्ररी या संस्थेकडून नेहरू ...
कोल्हापूर : गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशुराम जकाप्पा पाटील यांची नवी दिल्लीतील नेहरू मेमोरियल लायब्ररी या संस्थेकडून नेहरू फेलोशिपसाठी निवड झाली आहे. डॉ. पाटील हे युनायटेड नेशन्स, एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि स्टार्ट अप इंडियाचे मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत. ही फेलोशिप मिळविणारे डॉ. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी आहेत.
या संस्थेकडून निवडक सामाजिक शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, अशा १२ जणांची या फेलोशिपसाठी निवड झाली. त्यात डॉ. पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव आहेत. शेती आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अर्थकारण या विषयावर डॉ. पाटील यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेऊन त्यांची नेहरू फेलोशिपसाठी निवड झाली. या फेलोशिपच्या माध्यमातून ते भारतीय शेतीच्या बदलत्या अर्थकारणावर संशोधन करणार आहेत. त्यासाठी त्यांना दोन वर्षे दरमहा १ लाख ६५ हजार रुपये फेलोशिप मिळणार आहे. डॉ. पाटील यांचे चंदगडमधील र. बा. माडखोलकर कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उद्योगाचे भवितव्य’ या विषयावर पीएच.डी. केली. ‘ फॉरेस्ट अकाउंटिंग’ या विषयावर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी निर्यात धोरण सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणात त्यांना डॉ. एस. एस. महाजन, कैलास बवले आदींचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिक्रिया
नेहरू फेलोशिप ही प्रतिष्ठेची मानली जाते. ती मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या यशात आई-वडील, कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशाला शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अर्थकारणामध्ये जगात आघाडीवर नेण्याचे ध्येय आहे.
-डॉ. परशराम पाटील
फोटो (१६०३२०२१-कोल-परशराम पाटील (फेलोशीप)