नेहरूनगरात काँग्रेस-राष्ट्रवादीतच खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:39+5:302021-02-07T04:21:39+5:30

प्रभागांचा कानोसा, प्रभाग क्र. ५९, नेहरूनगर, आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्योती पाटील लोकमत न्यूज नेटवर्क, पाचगाव : कोल्हापूर ...

In Nehru Nagar, there is a rift between the Congress and the NCP | नेहरूनगरात काँग्रेस-राष्ट्रवादीतच खडाखडी

नेहरूनगरात काँग्रेस-राष्ट्रवादीतच खडाखडी

Next

प्रभागांचा कानोसा, प्रभाग क्र. ५९, नेहरूनगर, आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग

ज्योती पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क,

पाचगाव : कोल्हापूर शहरातील यल्लमा मंदिर परिसरातील नेहरूनगर प्रभाग क्र. ५९ यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वसाधारण उमेदवारांना यावेळी देखील आपली तलवार म्यान करावी लागणार आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय आरक्षण राहिले आहे, तरीसुद्धा खरी लढत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच होणार असल्याचे चित्र आहे. इच्छुकांनी आपापल्या परीने पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे येणारा काळच ठरवेल.

या प्रभागात २००५ मध्ये पद्मजा भुर्के निवडून आल्या होत्या. त्यांच्या काळात या प्रभागाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार देखील मिळाला होता, तर २०१० मध्ये पद्मजा भुर्के यांचे दीर दिलीप भुर्के यांनी प्रतिनिधित्व केले. २०१५ मध्ये हा प्रभाग अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने या प्रभागातून भाजपकडून ललिता ऊर्फ अश्विनी बारामते यांनी राष्ट्रवादीच्या पौरवी उगवे यांचा १५३ मतांनी पराभव केला होता. बारामते या भाजपमधून निवडून आल्या असल्या तरी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. सध्या हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने याठिकाणी काँग्रेसकडून अनिरुद्ध भुर्के, जगमोहन भुर्के, आरती बारामते, मीनल विजय पाटील इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीकडून रेखा उगवे इच्छुक आहेत. राजश्री आळवेकर व प्रीतम यादव यांनी भाजपकडून तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. इच्छुकांनी आतापासूनच प्रभागात गाठीभेटीवर भर दिला आहे. आता कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार यावर पुढील चित्र अवलंबून असणार आहे. या प्रभागात ड्रेनेज लाईन व ओढ्याला संरक्षक भिंत नसल्याने पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. तसेच अनेक समस्यांनी हा प्रभाग ग्रासला आहे.

...........

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

ललिता ऊर्फ अश्विनी बारामते : (भाजप) १३४६

पौरवी उगवे : (राष्ट्रवादी) ११९३

जयश्री सोनवणे : (काँग्रेस) ९४३

सरोजनी पोळ : (शिवसेना) १४८

प्रतिक्रिया

गेल्या पाच वर्षांत प्रभागात तीन कोटींच्या आसपास विकासकामे केली असून, भागातील अनेक समस्या सोडविल्या आहेत. या प्रभागात रस्ते, गटर्स, ओपन जिम, गटर्सवर चॅनेल अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. यापुढेही जनतेने संधी दिल्यास हा प्रभाग कोल्हापूर शहरातील आदर्श प्रभाग बनवू.

ललिता ऊर्फ अश्विनी बारामते, विद्यमान नगरसेविका

सोडविलेले प्रश्न

रस्ते,

प्रभागातील गटर्स, ओपन जिम, गटर्सवरील चॅनेल

प्रभागातील समस्या

अनेक समस्या असून, त्यापैकी कॉलनी अंतर्गत अनेक रस्ते खड्ड्यातच आहेत.

अंतर्गत ड्रेनेज लाईन नाही.

अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो.

आयसोलेशन हॉस्पिटलसमोर मोठी जागा असून, ती पडून असल्याने तिचा काहीही उपयोग होत नाही.

भागात क्रीडांगण नसल्याने खेळाडूंची कुचंबणा होते. ओढ्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात पूर आला की अनेक घरांत पाणी घुसते.

Web Title: In Nehru Nagar, there is a rift between the Congress and the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.