नेपाळमधील गलाई बांधव गोरखपुरात
By admin | Published: April 28, 2015 10:46 PM2015-04-28T22:46:40+5:302015-04-28T23:44:11+5:30
गुरुवारी पोहोचणार स्वगृही : स्वतंत्र बसने प्रवास; आणखी दोन बसेस रवाना
विटा : भूकंपाने हादरून गेलेल्या नेपाळच्या काठमांडू शहरातून सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यातील सुमारे २२ गलाई बांधव कुटुंबियांसह स्वतंत्र बसने भारतातील गोरखपूर येथे मंगळवारी दुपारी सुखरूप दाखल झाले. दरम्यान, काठमांडू शहरातील उर्वरित अन्य ८० ते ९० गलाई बांधव कुटुंबियांसह दुसऱ्या दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले आहेत. या प्रलयंकारी भूकंपाने हाहाकार उडाला असला तरी, मराठी गलाई बांधव सुखरूप असल्याचा निरोप गावाकडील नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी हे सर्व गलाई बांधव स्वगृही दाखल होणार आहेत.
नेपाळ येथील काठमांडू शहरात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सोने-चांदी गलाई बांधव वास्तव्यास आहेत. शनिवारी झालेल्या भूकंपाने काठमांडू शहर हादरून गेल्याचे समजताच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. दूरध्वनीवरून कोणताही संपर्क होत नसल्याने हे नातेवाईक हवालदिल झाले होते. सोमवारी आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडीचे पोपट चव्हाण यांच्यासह अन्य गलाई बांधवांनी आपापल्या नातेवाईकांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या येथील नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी येथील पोपट चव्हाण, दीपक खंडागळे, सुहास फडतरे, करण चव्हाण, नारायण चव्हाण, आवळाईचे नवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे, आटपाडीचे गणेश पाटील, नंदकुमार मरगळ, हर्षवर्धन पवार, तांदळवाडीचे गणेश सावंत, तडवळेचे तात्यासाहेब गिड्डे आदी गलाई बांधवांसह २२ जण स्वतंत्र बसने सोमवारी काठमांडूहून गोरखपूर येथे दाखल झाले.
मंगळवारी सायंकाळी चार वाजता खुशीनगर एक्स्प्रेसने हे सर्वजण मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते स्वगृही दाखल होणार आहेत. (वार्ताहर)
आणखी ८0 ते ९0 गलाई बांधव येणार
दरम्यान, काठमांडू शहरातील खानापूर तालुक्यातील वाळूजचे दीपक बाबर, कृष्णत बागल, संजय बागल, पळशीचे सचिन जाधव, करंजेचे पोपट मदने, साळशिंगेचे संभाजी जाधव, अकलूजचे शंकर शेळके, निमसोड (खटाव) चे हणमंत चव्हाण, बाळासाहेब पवार, आवळाईचे दशरथ जाधव, मुकुंदराव साळुंखे यांच्यासह सुमारे ८० ते ९० गलाई बांधव दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले असून, भूकंपाने नेपाळमधील नारायण घाटच्या डोंगराच्या कडा कोसळल्याने प्रवासास व्यत्यय आला आहे. या कोसळलेल्या कडा बाजूला करून रस्ता खुला करण्याचे काम युध्दीपातळीवर सुरू असून, येत्या दोन तासात हे सर्व गलाई बांधव नेपाळ-भारत सीमेवर पोहोचतील, अशी माहिती पोपट चव्हाण यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना दिली.