रत्नाप्पाण्णांच्या संस्थेत घराणेशाही; रजनीताई अध्यक्ष, मुलगा उपाध्यक्ष तर पती सचिव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:41 PM2022-06-14T12:41:47+5:302022-06-14T12:42:14+5:30
देशभक्त रत्नाप्पाण्णांना कुंभार जिवंत असेपर्यंत त्यांनी कुटुंबातील कुणालाही संस्थेत घेतले नाही आणि आता मात्र सगळाच ताबा कुटुंबातील लोकांनी घ्यावा याबद्दल समाजातून नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्थापन केलेल्या कौन्सिल ऑफ एज्युकेशन या नामांकित संस्थेतील नवी घराणेशाही चांगलीच चर्चेत आली आहे. कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम अध्यक्ष, मुलगा प्रसाद उपाध्यक्ष तर मगदूम यांचे पती विश्वनाथ मगदूम सचिव झाले आहेत. अण्णा जिवंत असेपर्यंत त्यांनी कुटुंबातील कुणालाही संस्थेत घेतले नाही आणि आता मात्र सगळाच ताबा कुटुंबातील लोकांनी घ्यावा याबद्दल समाजातून नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे.
मुलाला उपाध्यक्ष आणि पतीला सचिव करत रजनीताई मगदूम यांनी संस्थेचे सर्व निर्णय एकाच कुटुंबाच्या हातात राहावेत, अशी व्यवस्था केली आहे. याशिवाय ॲड. वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर हे दोन नवे संचालक आहेत. अण्णांनी व त्यानंतरही संस्थेने कायमच गुणवत्तेला महत्त्व दिले. तिथे पै-पाहुणे, जातपात, आर्थिक व्यवहार या बाबींना कधीच महत्त्व नव्हते. सध्या संस्थेची वाटचाल त्या दिशेने सुरू झाल्याच्या भावनाही व्यक्त होत आहेत.
या संस्थेच्या कॉमर्स कॉलेज, नाईट कॉलेज व शहाजी लॉ कॉलेज अशा शाखा आहेत. कॉमर्स कॉलेज स्वायत्त करण्यात आले आहे. संस्था पातळीवर राजकारण सुरू झाल्याने त्याचा तिन्ही काॅलेजच्या गुणवत्ता व नावलौकिकांवर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा संस्थेच्या हितचिंतकांकडून होत आहे. पुण्यापासून बेळगांवपर्यंत वाणिज्य शाखेतील उत्तम शिक्षण मिळण्याची सोय व्हावी यासाठी अण्णांनी या संस्थेचा पाया घातला व त्यातून कॉमर्स कॉलेज सुरू झाले.
रत्नाप्पाण्णा यांच्याकडे समाजाचा चौफेर विकासाचा दृष्टिकोन होता. त्यामुळे ते नुसता कारखाना काढून गप्प बसले नाहीत. सूतगिरणीपासून जनता बझार व पाणी योजनेपासून ते शिक्षणसंस्था स्थापन करून समाजाच्या उपयोगाचे सुरू करून त्यांनी चांगल्यारितीने चालवून दाखवले. अशा व्यक्तीने तब्बल पाच तपापूर्वी स्थापन केलेल्या संस्थेत सध्या एकाधिकारशाही सुरू आहे.
चिकोडी भागातील सदस्य..
तीन वर्षापूर्वी मावळत्या मंडळाची निवड झाली होती. त्यामध्ये प्रसाद कामत उपाध्यक्ष होते. ॲड.व्ही.एन.पाटील हे सचिव होते. डॉ.विश्वनाथ मगदूम व ॲड वैभव पेडणेकर सदस्य होते. आता कामत व ॲड पाटील यांना संस्थेतून कमी केले आहे. संस्थेच्या सभासदांची संख्याही २४ ने वाढवण्यात आली असून चिकोडी भागातील लोकांना त्यामध्ये स्थान देण्यात आल्याचे समजते. कांही सदस्यांच्या संबंधित कपौंडर, रिक्षाचालक, रिसेप्शनिस्ट यांनाही मेंबर करून घेतले असल्याचे समजते. संस्थेच्या वाटचालीत योगदान देणारे अनेक लोक कोल्हापूरात असताना त्यांचा विचार न करता सीमाभागातील लोकांना संधी देण्याबाबतही नाराजीची भावना आहे.