नेसरी-कोवाड वाहतूक आता बारमाही
By admin | Published: March 4, 2015 09:21 PM2015-03-04T21:21:14+5:302015-03-04T23:39:28+5:30
‘लोकमत’चा पाठपुरावा : तारेवाडी पर्यायी पुलास मिळाला निधी
राम मगदूम - गडहिंग्लज -‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने घटप्रभा नदीवरील तारेवाडी बंधाऱ्यानजीक प्रस्तावित पर्यायी पुलास तीन कोटी ७७ लाख ४० हजारांचा निधी मंजूर केला. ९० लाख ५८ हजारांच्या टोकण बजेटसह नवीन पुलास मंजुरी दिल्यामुळे नेसरी-कोवाड मार्गावरील वाहतूक आता बारमाही ‘सुरळीत’ व ‘सुरक्षित’ राहणार आहे. त्यामुळे नेसरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.१९७२ मध्ये नेसरी-कोवाड मार्गावर तारेवाडी-हडलगे दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा पूलवजा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे हडलगे, तारेवाडी, डोणेवाडी, तावरेवाडी व नेसरी या पाच गावांच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था झाली. तसेच वाहतुकीसाठीही या बंधाऱ्याचा वापर सुरू झाला.तारेवाडीनजीक ‘एस’ आणि ‘यू’ आकारातील धोक्याच्या वळणावर सखल भागात सध्याचा बंधारा आहे. त्याचे संरक्षक कठडेही निकामी झाले आहेत. बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्यांना, वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. गेल्या सात-आठ वर्षांत याठिकाणी झालेल्या अपघातात चारजणांचा, तसेच चार बैलांचाही मृत्यू झाला आहे.सध्याचा बंधारा रस्त्याच्या पातळीपेक्षाही सखल भागात आहे. दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतूक ८-१५ दिवस खंडित व्हायची. त्यामुळे पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी जनतेची मागणी होती. स्व. बाबासाहेब कुपेकर यांनीही त्याचा पाठपुरावा केला. पायाभूत सुविधांतर्गत नाबार्डच्या मंजूर कामांच्या यादीत या पुलाचा समावेश होता. प्राथमिक पाहणी व स्थळ पाहणीअंती सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यायी पुलाचा प्रारूप आराखडा तयार केला. संकल्पचित्र मंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव नाबार्डकडे दाखल केला. नाबार्डने त्यास हिरवा कंदील दाखविला. परंतु, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला असून, पर्यायी पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापुरातही सुरळीत वाहतूक
नवीन पूल उच्चतम पूरपातळीपेक्षाही अधिक उंचीवर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे महापुराच्या काळातही या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहणार आहे.
धोकादायक वळण निघणार
सध्याच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील बाजूच्या बैलगाडी मार्गास जोडणाऱ्या आणि काटकोनात बांधल्या जाणाऱ्या नवीन पुलावरील दोन पदरी रस्त्यामुळे सध्याचे धोकादायक वळण निघण्यास मदत होणार आहे.