‘नेताजी’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:26 AM2017-08-17T01:26:40+5:302017-08-17T01:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अतिशय थरारक आणि अटीतटीच्या वातावरणात चौथ्या फेरीत गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने धनंजय महाडिक युवा शक्तीच्या तीन लाखांच्या दहीहंडीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. खचाखच भरलेल्या दसरा चौकातील हजारो रसिकांना साक्षी ठेवत ‘नेताजी’चा गोविंदा प्रकाश मोरे याने बुधवारी रात्री
१० वाजता दहीहंडी फोडत पाच तासांची रसिकांची प्रतीक्षा संपवली.
‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी’ असा नावलौकिक मिळविलेल्या ‘युवा शक्ती’च्या या दहीहंडीसाठी दुपारी चारनंतर युवावर्ग मोठ्या संख्येने दसरा चौकात जमा होऊ लागला. ४९ फुटांवर सुरुवातीला दहीहंडी बांधण्यात आली होती. मात्र, तीन फेºया झाल्या, सात थर लावले तरीही दहीहंडी फोडण्यात यश येत नसल्याने अखेर रात्री साडेनऊनंतर ३६ फुटांवर दहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला. चौथ्या फेरीत शिरोळच्या जय हनुमान गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केला. मात्र, सहावा थर लावताना त्यांचा मनोरा कोसळला आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवत ‘नेताजी’ने बाजी मारली.
श्रीमंत ढोल-ताशा पथकाने दिलेली दणकेबाज सलामी, साथर्क क्रिएशन्सच्या कलाकारांचे दिलखेचक नृत्य आणि डीजेचा ठेक्यावर नाचणारी तरुणाई अशा जल्लोषी वातावरणात सायंकाळी सात वाजता शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दहीहंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, उल्हास पाटील, संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, अरुंधती महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जय हनुमान गोविंद पथक (शिरोळ), नृसिंह (कुटवाड), संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), नेताजी पालकर यांच्यात अंतिम लढतीसाठी संघर्ष सुरू झाला. मात्र नेताजी पालकरने मिळालेली संधी न गमावता शिस्तबद्धपणे मनोरा रचत सात थर लावून दहीहंडी फोडत दुसºयांदा विजेतपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी तीन लाखांचा धनादेश या पथकाला प्रदान करण्यात आला. माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन अध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई, रामराजे कुपेकर, भगवान काटे, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, सुहास लटोरे, उद्योगपती मिलिंद धोंड, समीर शेठ यांच्यासह विविध थरांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्णबधीर आणि पॅराआॅलिम्पिकमध्ये यश मिळविलेल्या सुबिया मुल्लाणी, अमित सुतार, केदार देसाई, प्राजक्ता पाटील, ओंकार राणे, अविष्कार सावेकर तसेच संतोष मिठारी यांचा सत्कार करण्यात आला. विजय टिपुगडे, सागर बगाडे, अनंत यादव, राजेंद्र बनछोडे, उत्तम पाटील, विनायक सुतार, इंद्रजित जाधव, संगाप्पा शिवपुलजी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले.