जिल्ह्यात पोलिसांंसाठी नवी ११५४ घरे

By admin | Published: October 19, 2016 12:18 AM2016-10-19T00:18:02+5:302016-10-19T00:18:02+5:30

दीपक केसरकर : राजेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा; २९ कोटी ४७ लाखांचा निधी

New 1154 houses for the district police | जिल्ह्यात पोलिसांंसाठी नवी ११५४ घरे

जिल्ह्यात पोलिसांंसाठी नवी ११५४ घरे

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात नवीन ११५४ पोलिस निवासस्थाने मंजूर करून त्यास २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. ही घरे येत्या तीन वर्षांत पूर्ण होऊन ती पोलिस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत दिली.
पोलिसांना कामाच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावता यावे, यासाठी ब्रिटिश काळापासून पोलिस वसाहतींची संकल्पना राबविण्यात आली. शंभर वर्षांपूर्वीची छोटेखानी घरांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यासंबंधी आमदार क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. याप्रश्नी सर्व विभागांची बैठक घेण्याची मागणी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्री केसरकर यांनी मंगळवारी त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात जुना बुधवार पेठ, कसबा बावडा, लक्ष्मीपुरी आणि लाईन बझार अशा एकूण चार पोलिस वसाहती असून, त्यांमध्ये ८८६ घरे आहेत. पोलिसांच्या संख्याबळापेक्षा ही घरे अत्यंत तोकडी आहेत. दीडशे घरे वापरासाठी धोकादायक असल्याने बंद आहेत. वसाहतीमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा वणवा आहे. खराब रस्ते, पडकी घरे, गळके छप्पर, अपुरा पाणीपुरवठा या समस्यांमुळे पोलिसांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री केसरकर यांनी जिल्ह्यासाठी नवीन जागेमध्ये ११५४ घरे मंजूर करून त्यासाठी २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला. बैठकीस वित्त विभागाच्या प्रधान सचिव गीता राजीवलोचन, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश शेठ, उपसचिव रा. को. धनावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, ‘म्हाडा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अवर सचिव दीपक पोकळे, ‘हुडको’चे नागेश्वर राव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


‘हुडको’च्या माध्यमातून ८८६ घरांची पुनर्बांधणी
शहरातील पोलिस वसाहतीमधील घरांच्या दुरुस्तीसाठी सुमारे दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने चालू वर्षी हा निधी नामंजूर केला. ‘हुडको’कडून अर्थसाहाय्य घेऊन जुन्या ८८६ घरांच्या पुनर्बांधणीसंबंधी चर्चा झाली. त्यासाठी हाउसिंग अ‍ॅँड अर्बन डेव्हलपमेंट (हुडको) यांनी तयारी दर्शविली. गृहविभागाने त्याकरिता प्रस्ताव ‘हुडको’ला सादर करण्याबाबत सूचित केले.

Web Title: New 1154 houses for the district police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.