कोल्हापुरी चप्पलची नवी ३० डिझाईन्स, लवकरच बाजारात येणार

By समीर देशपांडे | Published: August 7, 2024 01:46 PM2024-08-07T13:46:27+5:302024-08-07T13:46:43+5:30

शासनाच्या कंपनीकडून ३०० महिलांना कागल येथे प्रशिक्षण सुरू

New 30 designs of Kolhapuri Chappal, Training of 300 women started at Kagal from the government company | कोल्हापुरी चप्पलची नवी ३० डिझाईन्स, लवकरच बाजारात येणार

कोल्हापुरी चप्पलची नवी ३० डिझाईन्स, लवकरच बाजारात येणार

समीर देशपांडे

कोल्हापूर : जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची नवी ३० डिझाइन्स आता लवकरच बाजारात येणार आहेत. केंद्र सरकारच्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू करण्यात आलेल्या कोल्हापुरी लेदर ॲन्ड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने यासाठी सध्या ३० महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम कागल येथे सुरू आहे. राज्यातील अशा प्रकारची स्थापन करण्यात आलेली महिलांची पहिली कंपनी आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने इन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने अशा प्रकारे प्रशिक्षण देणारी ही कंपनी गतवर्षी स्थापन करण्यात आली. त्याचा निधीही जमा झाला असून कागल येथील महिला बचतगटाच्या विक्री केंद्राच्या इमारतीत सध्या प्रशिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे प्रशिक्षण सुरू आहे.

सकाळी ११ वाजता पहिल्या तुकडीतील ३० महिला प्रशिक्षणासाठी येतात. संध्याकाळी ११ वाजेपर्यंत त्यांना चप्पल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी दिल्लीहून ब्रिजेश जयस्वाल आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तात्रय सातपुते प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या तुकडीला एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून ते २७ जुलैपासून सुरू झाले आहे. या महिला नंतर याच पद्धतीने अन्य महिलांना प्रशिक्षित करणार असून यातून कौशल्यपूर्ण कारागिरांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

या गावच्या महिलांचा सहभाग

वसगडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, शिंगणापूर, पाचगाव या गावांतील या ३० महिला या ठिकाणी प्रशिक्षण घेत असून त्यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या चपलांचा स्टॉलही दोन दिवस जिल्हा परिषदेत लावण्यात आला होता. या ठिकाणी या कंपनीच्या अध्यक्षा वैशाली गवळी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धनाजी खाडे दैनंदिन प्रशिक्षणाचे कामकाज पाहतात.

महिन्यात १५ हजार चप्पल निर्मितीचे उद्दिष्ट

या कंपनीच्या वतीने कोल्हापुरी चप्पलमध्ये नवी डिझाइन आणून अशा पद्धतीची १५ हजार चप्पल महिन्याभरात तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. यासाठीचा कच्चा माल, प्रशिक्षणासाठीचा खर्च केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असून हे कौशल्यपूर्ण काम करताना महिलांमध्ये आत्मविश्वास आल्याचे जाणवल्याचे अध्यक्ष वैशाली गवळी यांनी सांगितले.

Web Title: New 30 designs of Kolhapuri Chappal, Training of 300 women started at Kagal from the government company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.