नवे कृषी कायदे पारतंत्र्यात घेऊन जाणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:06+5:302020-12-11T04:52:06+5:30
शिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानीसारख्या धनदांडग्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी खुली सूट देत असून, केंद्र शासनाने ...
शिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानीसारख्या धनदांडग्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी खुली सूट देत असून, केंद्र शासनाने पास केलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीसारख्या व्यवस्थेतील पारतंत्र्यात घेऊन जातील, अशी भीती माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शिरोली येथील छत्रपती संभाजीराजे चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती हातकणंगले यांच्यावतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेट्टी म्हणाले, अत्यावश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा, कंत्राटी शेती, शेतमालाला हमीभाव नाकारणे अशा शेती धोरणातून सहकार व्यवस्थेत दोष निर्माण झाले आहेत. ते दोष काढणे गरजेचे असताना त्याऐवजी पर्याय म्हणून खासगीकरण करणे आत्मघातकी आहे.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. नरेंद्र मोदी नोटबंदी व जीएसटी सारखे आत्मघातकी धोरणे शेती क्षेत्रात राबवू इच्छित आहेत. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढून भांडवलदारांची मक्तेदारी निर्माण होईल. शेतकरी त्यांचे मनसुबे उधळून लावतील.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले, दिल्लीमध्ये शेतकरी कडाक्याच्या थंडीत आपली प्राणांची बाजी लावून ऐतिहासिक आंदोलन करत आहेत. हा केवळ शेतकऱ्यांचा लढा नसून शेतमालाचा साठा करणाऱ्या भांडवलदारांकडून ग्राहकांची शोषणातून मुक्तता करण्याचा लढा आहे.
स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या सोबत महाराष्ट्रातील शेतकरी खांद्याला खांदा लावून लढतील, असे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, माजी उपसरपंच बाजीराव सातपुते, वैभव कांबळे, कृष्णात खवरे, श्रीकांत खटाळे, निशिकांत पद्माई, उत्तम पाटील, विशाल माने (हालोंडी), सुनंदा शिंदे, आर. आर. पाटील, उदय पाटील, जयश्री नाईक, शौकत देसाई, सूरज लंबे (नागाव), तात्याभाऊ पाटील, बाजीराव पाटील, राम बुडकर, प्रकाश परमाज यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१० राजू शेट्टी शिरोली