शेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी : डॉ. गणेश देवी यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 06:28 PM2020-09-24T18:28:57+5:302020-09-24T18:31:48+5:30
पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांनी बहुमताच्या जोरावर संसदेत शेतीची तीन सुधारित विधेयके मंजूर करून घेतली आहेत. याला देशभरातील शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाच्या सोशल फोरमअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकरी व संबंधित घटकामध्ये या विधेयकाविषयी वस्तुस्थिती मांडावी म्हणून गणेश देवी हे गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
कोल्हापुरात आल्यानंतर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन ते बाजार समितीत आयोजित अडते, व्यापारी, शेतकरी यांच्या बैठकीला आले. त्यांच्याशी संवाद साधताना नवीन कायदे आणि त्यांचे बाजार समितीच्या घटकांवर होणारे परिणाम यांचे विस्तृत विवेचन करून गाफील राहू नका. तीव्र लढ्यासाठी सज्ज राहा असे त्यांनी आवाहन केले. प्रा. जालंधर पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनाजी गुरव, सूर्यकांत पाटील यांनी मनोगत मांडले. मोहन सालपे यांनी आभार मानले.