कोल्हापुरात मार्चपर्यंत विमानसेवेचे नवे टर्मिनल्स खुले : मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया
By संदीप आडनाईक | Published: September 3, 2022 05:40 PM2022-09-03T17:40:36+5:302022-09-03T19:55:26+5:30
कोल्हापुरात देशांतर्गत विमानसेवेचे नवीन टर्मिनल्स मार्चपर्यंत खुले करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी शनिवारी लोकमतच्या कार्यक्रमात केली. देशातील सर्व प्रमुख शहरांना कोल्हापूर हवाई सेवेने कसे जोडले जाईल असा माझा व्यक्तिगत प्रयत्न असल्याचेही मंत्री सिंदिया यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेचे कोल्हापूरकरांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.
कोल्हापूर : कोल्हापुरात देशांतर्गत विमानसेवेचे नवीन टर्मिनल्स मार्चपर्यंत खुले करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी शनिवारी लोकमतच्या कार्यक्रमात केली. देशातील सर्व प्रमुख शहरांना कोल्हापूर हवाई सेवेने कसे जोडले जाईल असा माझा व्यक्तिगत प्रयत्न असल्याचेही मंत्री सिंदिया यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेचे कोल्हापूरकरांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.
कोल्हापूरात ६४ एकर जमीन राज्य सरकारने उपलब्ध करुन दिल्यास कार्गो विमानसेवाही सुरु करण्याची माझी जबाबदारी राहील. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यामध्ये लक्ष घालावे असेही सिंदिया यांनी यावेळी सूचवले. कोल्हापूर हे महाराष्ट्राच नव्हे तर देशाच्या पातळीवरील कृषी-सहकार औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचे शहर असूनही पुरेशा विमानसेवा नसल्याने या शहराची कोंडी होत आहे. त्यामुळे या शहराला देशातील हवाई वाहतूकशी जोडण्याचा आग्रह लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मंत्री महोदयांकडे धरला व तोच संदर्भ घेवून मंत्री सिंदिया यांनी घोषणा केली.
लोकमतच्यावतीने आयकॉन्स ऑफ कोल्हापूर या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन व समाजाच्या विविध क्षेत्रातील ४२ आयकॉन्सचा शानदार सत्कार सोहळा येथील हॉटेल सयाजीमध्ये झाला. यावेळी शाहू छत्रपती महाराज, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे, लोकमत एडिटारियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, लोकमत कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले, लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
हवाई चप्पल घालणारा सामान्य व्यक्तीने हवाई प्रवास केला पाहिजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आग्रह असल्याने देशांतर्गत हवाई वाहतूक अधिक विकसित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून मंत्री सिंदिया म्हणाले, देशातील २० कोटी लोक आता वर्षाला हवाई प्रवास करतात. ही संख्या २०३० पर्यंत ४० कोटीवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर, सिंधुदूर्गातील चिपीपासून ते बिहारमधील दरभंगासारखे विमानतळही कसे देशाच्या विमानसेवेशी जोडले जाईल यासाठी माझे प्रयत्न आहेत. हे करत असतानाच पुणे हे आंतरराष्ट्रीय विमानसेवेने जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंदिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांना अभिवादन केले. कुलदैवत ज्योतिबा आणि अंबाबाईचे स्मरण करुन कोल्हापूरचे तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे कौतुक केले. सिंदिया परिवार आणि कोल्हापूरचे जुने संबंध उलगडून सिंदिया म्हणाले, माझ्यासाठी हा भावूक क्षण आहे. आमच्या तीन पिढ्या दर्डा परिवाराशी जोडलेल्या आहेत. स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रयत्नातून लोकमतने विश्वासार्हता निर्माण करुन महत्वाचे योगदान दिले आहे. संगीत, शिक्षण, क्रीडा, अभिनय असे विविध क्षेत्र कोल्हापूरातील माणसांनी गाजवले आहे, त्याच कोल्हापूरातील वर्तमान पिढीचा सन्मान लोकमतने केला आहे, हा कोल्हापूरचा सन्मान आहे.
लोकमत एडिटारियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले, ज्योतिरादित्य सिंदिया आणि परिवाराचे कोल्हापूरच्या मातीशी नाते आहे. ज्योतिबा त्यांचे कुलदैवत आहे, देश चालविण्याची त्यांची क्षमता आहे. लोकांमध्ये मिसळणारे, जमिनीवर बसणारे हे दिलदार खानदानी राजकारणी व्यक्तिमत्व आहे. या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या कोल्हापूरातील आयकॉन्सचा गौरवही दर्डा यांनी केला.
यावेळी ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करण्यात आले. कोल्हापूर लोकमतच्या आवृत्तीने अव्वल क्रमांक मिळविल्याबद्दल कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले आणि सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांचा ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांचा पुतळा भेट देवून सन्मान करण्यात आला. तर लोकमत परिवाराकडून अंबाबाईची प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमात समूह संपादक विजय बाविस्कर, वसंत भोसले यांनीही मार्गदर्शन केले. . यावेळी आमदार जयश्री जाधव, माणिक मंडलिक, प्राचार्य टी.एस.पाटील, व्यंकप्पा भोसले यांच्यासह कोल्हापूरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दर्डा यांचे मानले आभार..
कोल्हापूरच्या विमानतळ विकासाचे प्रश्र्न लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मंत्री सिंदीया यांच्याकडे ठामपणे मांडले. केंद्रीय मंत्री जेव्हा एखाद्या शहरात कार्यक्रमाला जातात ते तेव्हा रिकाम्या हाताने जात नाहीत. तेव्हा कोल्हापूरच्या प्रश्र्नांची सोडवणूक त्यांनी करावी असा आग्रह धरला. त्यामुळे विमानतळ विकासाबध्दल मंत्री सिंदिया यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतल्याने या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोल्हापूरच्या आयकॉन्सनी दर्डा यांचे कार्यक्रम संपल्यानंतर आवर्जून भेटून आभार व्यक्त केले.
चंद्रकांतदादा, ६४ एकर जागा द्या, मोठे विमान आणतो
कोल्हापूरात ६४ एकर जागा मिळवून द्या, कार्गो विमान येथे उतरवतो, अशा शब्दात ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मंत्री चंद्रकांतदादा यांच्याकडे मागणी केली.
शिंदे आणि मुख्यमंत्रीपद...
ज्योतिरादित्य सिंदिया यांचे शिक्षण परदेशात झाले, असले तरी त्यांची भाषा मराठीच आहे. मराठी मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे कांही मी म्हणणार नाही पण त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व्हावेच शिवाय देशाचे नेतृत्व करण्याचीही धमक त्यांच्यामध्ये आहे असे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहून सूचवले. त्यावर मंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातही सध्या शिंदेच मुख्यमंत्री असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.