कॅनॉलवर उभारला नवा साकव
By admin | Published: February 3, 2015 09:49 PM2015-02-03T21:49:45+5:302015-02-03T23:54:45+5:30
लोकमत इफेक्ट : बोरवडे-उंदरवाडीतील ग्रामस्थांना दिलासा
रमेश वारके - बोरवडे -‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे खात्याने बोरवडे व उंदरवाडी या गावांतील कॅनॉलवर नवीन साकव तयार केले. या नव्या साकवांमुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ‘पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष’, ‘साकवावरील वाहतूक बनली मृत्यूचा सापळा’, ‘बोरवडे-उंदरवाडी साकवाची दुरवस्था’, असे वृत्त प्रकाशित करत ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केला होता.
कागल तालुक्यातील बोरवडे व उंदरवाडी या गावांच्या कॅनॉलवर असणाऱ्या साकवांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे अनेक अपघात होऊनही याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाले होते. कॅनॉल दुथडी भरून वाहत असल्याने दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत होती. साकवावरील पत्रा गंजून तो कमकुवत झाल्याने सडत चालला होता. त्यामुळे जनावरांचे पाय अडकणे, वाहतूक करताना शेतकरी पडणे, फाटलेल्या पत्र्यात पाय अडकून जखमा होणे, असे अपघात येथे वारंवार घडत होते. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून साकवाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला होता.
साकवाच्या पूर्ततेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना नेऊन त्याचा पंचनामा करून आंदोलने केली होती. या साकवाच्या उभारणीमुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
साकव नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांचा प्रवास बंद होता. त्यामुळे साकव दुरुस्तीची मागणी सतत होत होती. पाटबंधारे खात्याच्या सहकार्यामुळे नवीन साकव उभारण्यात आला असून, यामुळे सर्वांचाच त्रास कमी होणार आहे. - चंद्रकांत पाटील, सरपंच
या दोन्ही गावांतील साकवाच्या पूर्ततेसाठी आम्ही अनेकवेळा आंदोलने केली. साकव पूर्ण होणे ही शेतकऱ्यांची गरज होती. यामुळे येथील दळणवळण सोपे झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी यामुळे दूर होणार आहेत.
- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख.