‘त्यांच्या’ जगण्याला मिळाले नवे सौंदर्य, कोल्हापुरात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:06 PM2018-12-05T17:06:51+5:302018-12-05T17:11:49+5:30
दुभंगलेले ओठ जोडण्यासह चेहऱ्यावरील विद्रुप व्रण, डाग यांच्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याने सुमारे १२५ जणांच्या जगण्याला नवे सौंदर्य बुधवारी लाभले.
कोल्हापूर : दुभंगलेले ओठ जोडण्यासह चेहऱ्यावरील विद्रुप व्रण, डाग यांच्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याने सुमारे १२५ जणांच्या जगण्याला नवे सौंदर्य बुधवारी लाभले. भारतीय जैन संघटना (बीजेएस), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि जैन डॉक्टर्स फेडरेशनच्या वतीने आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचा प्रारंभ झाला.त्याच्या पहिल्या दिवशी सुमारे चारशे जणांनी नोंदणी केली.
प्लास्टिक सर्जन डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता ‘बीजेएस’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पारस ओसवाल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबीराचे उदघाटन झाले.
कोल्हापुरात बुधवारी प्लास्टिक सर्जन डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ भारतीय जैन संघटना, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि जैन डॉक्टर्स फेडरेशनच्यावतीने आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीरासाठी कोल्हापूरसह राज्यभरातील रूग्ण सहभागी झाले. (छाया : नसीर अत्तार )
यावेळी ओसवाल म्हणाले, या प्लास्टिक सर्जरी शिबीराचे यंदा अकरावे वर्ष आहे. त्यामध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाते. औषधे दिली जातात. या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश आहे.
पाटील म्हणाले, या उपक्रमाला डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सर्वोतोपरी सहकार्य केले जाते. यापुढील देखील राहील.
या कार्यक्रमास अमेरिकेतील डॉ. राजलाला, डॉ. अमित बसण्णावार, डॉ. प्रकाश संघवी, गिरीश कर्नावट, बी. एन. पाटील, वृषभ छाजेड, अनिल पाटील, अतुल भंडारी, आदी उपस्थित होते. प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शितल पाटील यांनी स्वागत केले. ‘बीजेएस’चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिनंदन खोत यांनी आभार मानले.
राज्यभरातील रूग्णांची उपस्थिती
या शिबीराच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरसह पुणे, सातारा, इंदापूर, कराड आदींसह राज्यभरातील सुमारे चारशे रूग्णांनी नोंदणी केली. सकाळी दहा ते दुपारी साडेबारापर्यंत नोंदणी केलेल्या रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी एक ते सायंकाळी पाच यावेळेत सुमारे १२५ जणांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
त्यामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यांवरील विद्रुप व्रण, डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती दूर करणाऱ्या शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आल्या. रक्ततपासणी, भूलतज्ञ यांची आवश्यकता असणाऱ्या शस्त्रक्रिया गुरूवारी केल्या जाणार असल्याचे डॉ. शितल पाटील यांनी सांगितले.