न्यू काॅलेजला ‘नॅक’चे ‘ए प्लस’मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:20+5:302021-04-01T04:25:20+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने (नॅक) न्यू काॅलेजला ए-प्लस असे मूल्यांकन बुधवारी जाहीर झाले. या मूल्यांकनातून काॅलेजची ...
कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने (नॅक) न्यू काॅलेजला ए-प्लस असे मूल्यांकन बुधवारी जाहीर झाले. या मूल्यांकनातून काॅलेजची शैक्षणिक गुणवत्ता आणखी वाढणार असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. व्ही. एम. पाटील यांनी दिली. मूल्यांकन जाहीर झाल्यावर कॉलेजमधील सर्व घटकांनी जल्लोष करून आनंद साजरा केला. नॅकच्या नवीन मूल्यमापन मानांकनानुसार काॅलेजने शिवाजी विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च मानांकन प्राप्त केले.
नॅक मूल्यांकन समितीचे अध्यक्ष डाॅ. आर. के. पांडे, समन्वयक डाॅ. आफताब अलम, सदस्य प्रो. नंदकिशोर, प्रा. डाॅ. झहूर छाट यांच्या समितीने २३ व २४ मार्चला भेट देऊन मूल्यांकन केले. मागील दोन्ही मानांकने कमी होती. त्यामुळे प्राचार्य डाॅ. व्ही. एम. पाटील, उपप्राचार्य डाॅ. ए. एम. शेख व प्रबंधक एच. के. सोनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग, प्रयोगशाळा, जिमखाना सुसज्ज करून मूल्यांकनाला सामोरे गेले. नॅक समन्वयक डाॅ. नीलेश पवार यांनी अपेक्षित मुद्द्यांची मांडणी करून महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांचे चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले. त्यामुळे मूल्यांकन समितीने ’ए प्लस’ मानांकन जाहीर केले. महाविद्यालयास ३.३२ इतका सीजीपीए प्राप्त झाला.
या मानांकनामुळे काॅलेजला नवीन अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करता येणार आहे. याशिवाय युजीसीकडून अनुदानही मोठ्या प्रमाणात मिळेल. देशातील गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांमध्ये या काॅलेजचा समावेश होणार आहे. सद्यस्थितीत काॅलेजमध्ये ४२५२ विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. गुणवत्ता, कला, क्रीडा व सांस्कृतिक या क्षेत्रात काॅलेज गुणवत्ताधारक आहे, यावर नॅकने शिक्कामोर्तब केला.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के. जी. पाटील, अध्यक्ष बी. जी. बोराडे, संचालिका सई खराडे, सविता पाटील, सचिव प्रा. विनय पाटील, व्ही. के. पाटील, सचिव रणजित शिंदे, ए. ए. कलगौंडा, प्रा. तुकाराम सरगर आदी उपस्थित होते.