दहा जानेवारीपर्यंत नवे सहकार आयुक्त
By Admin | Published: December 26, 2014 12:44 AM2014-12-26T00:44:12+5:302014-12-26T00:44:39+5:30
चंद्रकांत पाटील : दळवी यांचे नाव चर्चेत
विश्वास पाटील - कोल्हापूर =-राज्याचे नवे सहकार आयुक्त दहा जानेवारीपर्यंत नियुक्त होतील, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सध्या प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांसमवेतच रोज मी काम करीत आहे; त्यामुळे रीतसर आयुक्त नियुक्तीचा विषय सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहे. दहा जानेवारीपर्यंत नवीन अधिकारी रुजू होईल, असे सहकारमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे अडीच लाख सहकारी संस्थांचा कारभार आयुक्तालयामार्फत चालतो. सध्या अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर यांच्याकडे प्रभारी जबाबदारी आहे. जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांचेही नाव या पदासाठी सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांची नियुक्ती कधी होणार, अशी विचारणा सहकारमंत्र्यांकडे केली.
दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाचा सहकारी संस्था हा पाया आहे. त्यावर काँग्रेसवाल्यांची आजही मजबूत पकड आहे; त्यामुळे या संस्थांचे नियमन करणारा अधिकारी आपण म्हणू तसे निर्णय घेणारा हवा, असा आग्रह मागच्या सरकारमधील मंत्र्यांचा राहिला. त्यामुळे थेट ‘आयएएस’पेक्षा पदोन्नतीने ‘आयएएस’ झालेले अधिकारी नियुक्त करण्यास प्राधान्य दिले गेले. असे अधिकारी महाराष्ट्रीय असतात. त्यांना मंत्र्यांचा शब्द मोडणे अवघड बनते.
मागच्या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता, राज्यातील सत्तांतर यांमुळे हे पद रिक्त राहिले आहे. आता नवे सरकार स्थिरस्थावर झाल्याने आयुक्तांची नियुक्ती व्हायला हवी. सहकार खाते भाजपकडे आहे व त्या पक्षाला या क्षेत्रात वर्चस्व निर्माण करायचे आहे. मग जे चालू आहे तेच पुढे न्यायचे किंवा सहकाराचे शुद्धिकरण करायचे, असे पर्याय त्यांच्यापुढे आहेत. शुद्धिकरण करायचे असल्यास खमक्या अधिकारी हवा.
सध्या आयुक्त नसल्याने या खात्याचे काम काही प्रमाणात दिशाहीन झाले आहे. जे नियमित काम आहे ते अधिकारी नसला तरी बंद होत नाही; परंतु काही महत्त्वाचे निर्णय घेताना प्रभारी अधिकाऱ्यावर मर्यादा येतात. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका, नव्या सावकारी कायद्याची अंमलबजावणी यांसारखे महत्त्वाचे विषय सध्या तोंडावर आहेत. यासाठी तातडीने आयुक्ताची नियुक्ती होण्याची मागणी सहकार क्षेत्रातून होत आहे.
नऊ महिने पद रिक्त
ग्रामीण अर्थकारणाचे महत्त्वाचे अंग असलेल्या सहकार विभागाचे आयुक्तपद गेली नऊ महिने रिक्त आहे.
यापूर्वीचे अधिकारी मधुकर चौधरी हे ३० एप्रिलला निवृत्त झाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त झाले.
परंतु त्यांच्या रिक्त जागेवर नवीन आयुक्त नियुक्त न झाल्याने त्या विभागाच्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे.