सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:56 PM2023-05-05T12:56:55+5:302023-05-05T12:57:39+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कामासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ कोल्हापूर (शिरोली) ते सांगली (अंकली) या ३३.८३५ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची (८४० कोटींचा प्रकल्प) माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गुरुवारी घेतली. कर्नाटकातील बोरगाव येथील प्रचारसभेसाठी ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात आले होते. सकाळी १२ वाजता ते कोल्हापूर विमानतळावर खासगी हेलिकॉप्टरने आले आणि बोरगाव येथील कार्यक्रम आटाेपून दुपारी २:३० वाजता त्यांनी नागपूरकडे प्रयाण केले. खासदार महाडिक बोरगावहून त्यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळापर्यंत सोबत होते.कोल्हापूरपर्यंतच्या प्रवासात गडकरी यांनी महाडिक यांच्याशी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते. वाढत्या रहदारीमुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली, त्यामुळे हा मार्ग प्रवासासाठी अडचणीचा ठरत होता. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.
विमानतळाची घेतली माहिती
कोल्हापूर विमानतळाचा विकास होत असून, येथील वर्दळ विचारात घेऊन विमानतळ मार्गाच्या चौपदरीकरणाचा विचार गडकरी यांच्याकडे खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. सध्या या विमानतळावरून ७ विमानांचे उड्डाण होते आणि पुढील महिन्यात नागपूर, इंदूर विमानसेवा सुरू होणार असल्याबद्दलही गडकरी यांनी सांगितले आहे.