‘केशवराव’मध्ये आता नवा वाद
By admin | Published: October 4, 2015 12:44 AM2015-10-04T00:44:58+5:302015-10-04T00:44:58+5:30
दिग्गज रंगकर्मींऐवजी वेगळीच नावे
कोल्हापूर : कोल्हापूर ही कलावंतांची नगरी... राजर्षी शाहू महाराजांच्या राजाश्रयाने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रूपाने येथे नाट्यकला रुजली. मात्र, नूतनीकरणानंतर नव्या दिमाखात उभारलेल्या या नाट्यगृहाच्या आवारात लावण्यात आलेल्या नामफलकांवर कोल्हापुरात ही कला रुजविलेल्या दिग्गज रंगकर्मींऐवजी वेगळीच नावे लावण्यात आली आहेत. त्यामुळे येथील रंगकर्मींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण आता पूर्ण झाले आहे. या नाट्यगृहाच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारांजवळ चित्रपट व नाट्यसृष्टीतील काही कलावंतांच्या नावांची पाटी लावण्यात आली आहे; पण त्यात कोल्हापुरात नाट्यचळवळ रुजविलेल्या पूर्वीच्या काळातील कलावंतांची, रंगकर्मींची नावेच नाहीत. त्याऐवजी अलीकडच्या काळातील चित्रपटसृष्टीतील कलाकारांची नावे लावण्यात आली आहे. हे कलाकार मूळचे कोल्हापूरचे तर नाहीतच; पण त्यांनी या शहरातील नाट्यचळवळीत मोलाचे योगदान दिल्याचेही ऐकिवात नाही. कलावंतांना गावाच्या सीमारेषेत बांधता येत नाही; पण नामफलक पाहिले तर त्यांच्याऐवजी कितीतरी दिग्गज कलावंतांनी या शहराला समृद्ध केले, ज्यांनी नावे या नाट्यगृहाच्या आवारात असणे गरजेचे आहे; पण ती वगळण्यात आली आहेत. हे नामफलक पाहिलेल्या व्यक्तींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय महापालिकेने कोणत्या निकषांच्या आधारावर ही नावे ठरवली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.