वैद्यकीय महाविद्यालयाचा नवा अधिष्ठाता अजून ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:08 PM2020-05-26T18:08:20+5:302020-05-26T18:10:33+5:30
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता कोण हेच अजून शासकीय पातळीवर ठरेना झाले आहे, असे चित्र सोमवारी पुढे आले. मावळत्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी रविवारी रात्री कार्यभार सोडला व येथे बदली झालेल्या डॉ. जयप्रकाश रामानंद यांना विरोध झाल्यामुळे त्यांची बदली रद्द झाली आहे.
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता कोण हेच अजून शासकीय पातळीवर ठरेना झाले आहे, असे चित्र सोमवारी पुढे आले. मावळत्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी रविवारी रात्री कार्यभार सोडला व येथे बदली झालेल्या डॉ. जयप्रकाश रामानंद यांना विरोध झाल्यामुळे त्यांची बदली रद्द झाली आहे.
डॉ. रामानंद यांच्या बदलीस सीपीआरमधील घडामोडी कारणीभूत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांनी पुढाकार घेवून ते आरोग्यमंत्री असताना सीपीआरमध्ये ह्रदयरोगांवर उपचार करणारे कार्डियाक सेंटर सुरू केले.
गोरगरीब रुग्णांवर तिथे चांगले उपचार व्हावेत आणि त्यांची पुण्या-मुंबईला जाण्यासाठी होणारी फरफट थांबावी हा चांगला हेतू त्यामागे होता. परंतु पुढे तिथे प्रभारी अधिष्ठाता असलेल्या डॉ. रामानंद यांनी या सेंटरला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही.
तिथे होणारी कॅथलॅबही कशी होणार नाही याची व्यवस्था त्यांनी केल्याची मुख्यत: तक्रार आहे. त्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या व जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी कायमच आग्रही असलेल्या नेत्यांचे त्यावेळीही रामानंद यांच्याशी मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांची येथे बदली झाली असल्याचे समजताच त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना फोन करून हा माणूस आम्हाला येथे चालणार नाही. दुसरे कोणीही द्या परंतु रामानंद नकोत, असे सूचविल्याने रामानंद यांची बदली रात्रीत रद्द झाली.
ज्यांनी रद्द करा म्हणून सांगितले त्यांनाच तुम्ही नाव सूचवा, अशी सूचना मंत्र्यांनी केली होती परंतु त्यांनी तुम्ही कुणालाही द्या, त्यास आमचा आक्षेप नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु मंत्रालयाच्या पातळीवर नव्या अधिष्ठाता यांचे नाव होण्यास विलंब होत आहे.
गजभिये यांना वाटेतच रोखले..
डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगांवमधील स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्या देखील तिथे रुजू झालेल्या नाहीत. पुण्यातून पुढे गेल्या असतानाच सोमवारी त्यांना आपण जळगावला जाऊ नये असा निरोप अधिकृत सूत्रांनी दिला. त्यामुळे त्या आता कुठे हजर व्हायचे याची प्रतीक्षा करत नाशिकमध्ये थांबल्या आहेत.