साहित्यातून जीवनास नवी ऊर्जा
By admin | Published: May 10, 2017 12:16 AM2017-05-10T00:16:07+5:302017-05-10T00:16:07+5:30
प्रकाश आबिटकर : गारगोटी येथे वेदसागर साहित्य मंचच्या पुरस्कारांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क ==गारगोटी : साहित्यातून मानवी जीवनाला नवी ऊर्जा व शक्ती मिळते. यासाठी साहित्यात भावभावनांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
ते गारगोटी येथील शाहू वाचनालयात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. मराठी साहित्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी २५ वर्षे साहित्य चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या वेदसागर साहित्य मंचच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते. उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक वेदसागर साहित्य मंचचे अध्यक्ष राजन कोनवडेकर यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष कवी गोविंद पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी म्हात्रे म्हणाले की, ज्या साहित्यात मानवता व नैतिकता ही मूल्ये असतात, असेच साहित्य जिवंत राहते आणि मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करते. माजी आमदार देसाई म्हणाले, साहित्य हे मानवी मनाचे टॉनिक आहे. साहित्यात मन, मेंदू आणि मनगट यांना बळकट करण्याची शक्ती आहे.
यावेळी संजय देसाई, धनाजी कुंभार, डॉ. मा. ग. गुरव, प्रवीण गुरव, एम. एच. बारड, मधुकर आसबे, बी. एस. दंडवते, अमृता शिरगांवकर, अंचित दाभोळे, आदी उपस्थित होते.
प्रौढ साहित्य पुरस्कार - सदानंद पुंडपाळ (उत्तूर), डॉ. नलिनी महाडिक (सातारा), दीपक फाळके (बुलढाणा). बालवाङ्मय पुरस्कार- यशवंत माळी (देशिंग), राजाराम कोळी (वडूज), शि. नि. हंचनाळे (हलकणी). विशेष पुरस्कार- डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), संजय खोचारे (मुरुक्टे), छाया घाटगे (मुंबई), पी. एन. देशपांडे (कोल्हापूर). प्रबोधनात्मक पुरस्कार-संग्रामसिंह मस्कर (पारधेवाडी) यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.