कलेतील नव्या चेहऱ्याचे दर्शन
By admin | Published: February 17, 2016 12:11 AM2016-02-17T00:11:07+5:302016-02-17T00:45:36+5:30
विद्यार्थ्यांच्या कलाकृर्ती : दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटच्या वार्षिक चित्रप्रदर्शनाला प्रारंभ
कोल्हापूर : व्यक्तिचित्र, निसर्ग, स्थिरचित्र, पोट्रेचर पेंटिंग, कंपोजिशनसह थ्रीडी (त्रिमितीय), आदी प्रकारांतील चित्रांतून कलेतील कोल्हापूरच्या नव्या चेहऱ्याचे दर्शन शहरवासीयांना घडत आहे. निमित्त आहे ते दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी विभागाच्या वार्षिक चित्रप्रदर्शनाचे. या प्रदर्शनाला मंगळवारी प्रारंभ झाला.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात दळवीज् आर्ट एज्युकेशन सोसायटी संचलित दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे संस्थापक दत्तोबा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे वार्षिक चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी दळवीज् आर्ट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी आमदार बाबूराव धारवाडे, सचिव कमलताई दळवी, विश्वस्त पांडुरंग पाटील, प्रा. अर्चना आंबिलढोक, विजय टिपुगडे, सागर बगाडे, प्रवीण वाघमारे, दीपक कांबळे, आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम सरनाईक, शामली चव्हाण, पुरुषोत्तम पोवार, विवेक कवाळे, अक्षय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य अजेय दळवी यांनी प्रास्ताविक केले. दुर्गा आजगांवकर यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित कांबळे यांनी आभार मानले. दरम्यान, इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतच्या १२७ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी एकूण ३00 चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. प्रदर्शन पाहण्यास कलाप्रेमींनी गर्दी केली होती. प्रदर्शन गुरुवारपर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)
+++
वेगळी ओळख
कोल्हापूरच्या कलापरंपरेची वेगळी आणि नवी ओळख होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी केले. ते म्हणाले, विविध स्वरूपातील कलाकृतींच्या माध्यमातून कोल्हापूरसह देशाचा नावलौकिक विद्यार्थ्यांनी करावा. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटचा उपक्रम उल्लेखनीय आहे.
थ्रीडी चित्रांचा समावेश
इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमाच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांनी यावर्षी पहिल्यांदाच संगीत ही संकल्पना घेऊन थ्रीडी चित्रे सादर केली आहेत. त्यात तबला, हार्मोनिअम, पियोनो, आदी वाद्यांवरील चित्रांचा समावेश असल्याचे प्राचार्य दळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘कोल्हापूर स्कूल’ परंपरा आणि आधुनिक पद्धतीतील कलेचा संगम प्रदर्शनात आहे.