नव्या प्रभागात नव्या चेहऱ्यांचीच परीक्षा

By admin | Published: September 18, 2015 12:23 AM2015-09-18T00:23:35+5:302015-09-18T00:33:00+5:30

नेत्यांचे वारसदारच पुढे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संपर्क, संमिश्र लोकवस्तीमुळे लागणार कस

New faces in new division test | नव्या प्रभागात नव्या चेहऱ्यांचीच परीक्षा

नव्या प्रभागात नव्या चेहऱ्यांचीच परीक्षा

Next

इंदुमती गणेश - कोल्हापूर --दोन प्रभागांत विभागला गेल्याने नव्याने तयार झालेला रायगड कॉलनी जरगनगर प्रभाग ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. या प्रभागातून स्मिता सुस्वरे, रूपाली बावडेकर, गीता गुरव, शारदा लोहार या महिला महापालिका निवडणुकीत आपले नशीब अजमावणार आहेत.
शहराच्या उपनगरांत मोडणाऱ्या रायगड कॉलनी-जरगनगर प्रभागात उच्च मध्यमवर्गीय व सर्वसामान्य अशी संमिश्र लोकवस्ती आहे. येथे अपुरा पाणीपुरवठा, कचरा उठाव, बागेचा अभाव अशा समस्या आहेत. पूर्वी मध्यवर्ती कारागृह या प्रभागात हा परिसर असल्याने तिथे मधुकर रामाणे हे विद्यमान नगरसेवक आहेत. आता हे दोन प्रभाग वेगळे आहेत. रायगड कॉलनी-जरगनगर हा प्रभाग महिला राखीव झाल्याने गतवेळच्या निवडणुकीत मधुकर रामाणे यांच्याविरोधात निवडणूक लढविलेल्या संदीप पाटील यांनी आपल्या बहिणीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. स्मिता अतुल सुस्वरे असे त्यांचे नाव असून, संदीप आणि स्मिता ही दोन्ही भावंडे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांची मुले; त्यामुळे स्मिता यांना राजकीय वारसा लाभला आहे. संदीप यांना गतनिवडणुकीत अपयश आले असले तरी त्यांनी प्रभागातील नागरिकांचा संपर्क ठेवत त्यांच्या विविध अडचणींत सहकार्य केले आहे. स्मिता सुस्वरे या पहिल्यांदाच निवडणूक लढवित असल्या तरी भावाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्या स्वत: महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांशी जोडल्या गेल्या आहेत. त्या पाठबळावर त्या काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढवित आहेत.
या प्रभागातून रूपाली अमोल बावडेकर या शिवसेनेच्यावतीने निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. रूपाली या बी. ए., बी. एड्. असून, त्यांना प्रभागातील मूलभूत समस्यांची जाण आहे. या प्रभागातून शारदा अशोक लोहार यादेखील निवडणूक लढवीत आहेत. गेली ३५ वर्षे भाजपशी एकनिष्ठ असलेले अशोक लोहार यांच्या त्या पत्नी असून त्या विविध आंदोलने, निदर्शने, मोर्चांमध्ये सहभाग घेत जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहेत. बचत गट व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या महिलांशी संपर्कात आहेत. त्यांचा मुलगा अमृत लोहार हा देखील भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस या पदावर काम करीत आहे. त्यामुळे या कुटुंबाचा नागरिकांशी चांगला संपर्क आहे.
या प्रभागातून गीता श्रीपती गुरव याही निवडणूक लढवित आहेत. त्या महाडिक गटाच्या समर्थक असून, ताराराणी आघाडी आणि भाजपकडून रिंगणात उतरणार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या जनतेपुढे आपले म्हणणे मांडत आहेत. भागात डिजिटल फलक, पत्रकांचे वाटप, पोस्टर्स, आरतीसंग्रह या माध्यमांतून त्या प्रचार करीत आहेत.


असा आहे प्रभाग
सरनाईक कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, व्ही. आर. इस्टेट, आय. टी. आय., गणेश कॉलनी, जगतापनगर, गुलाबनगर, रंगनाथ हौसिंग सोसायटी परिसर, जरगनगर परिसर, बळवंत नगर, मंडलिक वसाहत परिसर, रायगड कॉलनी परिसर, रि.स.नं. २४० मधील गुंठेवारी विकास, कृष्णसरस्वती मंगल कार्यालय, जरगनगर शाळा परिसर.


रायगड कॉलनी, जरगनगर

Web Title: New faces in new division test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.