यवलूजात महापुराने कोरली नवीन पूररेषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:09+5:302021-07-29T04:25:09+5:30
यवलूज : यवलूज ( ता. पन्हाळा ) गावाला यापूर्वीही महापुराचा विळखा पडला होता. सन १९८९ , २००५ ...
यवलूज : यवलूज ( ता. पन्हाळा ) गावाला यापूर्वीही महापुराचा विळखा पडला होता. सन १९८९ , २००५ , २०१९ साली महापुराच्या पाण्याने गावाला वेढले होते. पण यावेळी मात्र २०२१ च्या महापुराने मागील सर्व महापुराची पूररेषा ओलांडत अनेकांच्या संसारावर पाणी फिरवले. अवध्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने बघता- बघता गावच्या तिन्ही बाजूला पुराच्या पाण्याने वेढले. रात्रीतच महापुराच्या प्रचंड वेगाने वाहत्या पाण्याने सखल भागात रुद्ररूप धारण करत अनेकांच्या घरादारांत प्रवेश केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मध्यरात्रीत घरात पाणी शिरलेल्या नागरिकांनी वाढती पाणीपातळी लक्षात घेऊन आपल्या संसाराचा गाडा आहे तिथेच सोडून कुटुंबासह जनावरांना सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने यावेळी मोठा धोका टळला आहे. तरीही यापुढे गावातील पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांसाठी भविष्यातील पावसाळ्यात येणारा पूर हा कायम धोक्याची घंटा बनून राहणार आहे. अलीकडच्या काळात बहुतांश नागरिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गावच्या वेशीतून कासारी नदीपात्राला जोडलेल्या ओढ्या-नाल्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. भली मोठी पाण्याची पात्रे बुजुवण्याचा सपाटाच जणू त्यांनी लावला असल्याने त्याचा मोठा परिणाम या वेळच्या महापुरात दिसून आला. गावाशेजारून कासारी नदीकडे वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलली. पुराचे पाणी गावातील अनेक घरात एका रात्रीत घुसल्याने लोकांची घाबरगुंडी वळाली. यंदाच्या महापुराने यापूर्वी गावात आलेल्या महापुराच्या पाण्याच्या पाऊलखुणा पुसत नवीन वाढत्या पूररेषेची नोंद केली आहे. त्यामुळे ओढ्या नाल्यांचे अस्तित्व जिवंत ठेवले तरच नागरी जीवन सुरक्षित राहील, हा संदेश नागरिकांना या महापुराच्या रूपाने दिला आहे.
फोटो :
यवलूज येथे यंदा एका रात्रीत आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या राहत्या घरांना व शेतीला बेटाचे स्वरूप आले होते.