‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथ नव्या स्वरूपात
By Admin | Published: August 30, 2016 12:34 AM2016-08-30T00:34:30+5:302016-08-30T00:35:32+5:30
इंद्रजित सावंत यांची माहिती : पाच खंडांच्या ग्रंथाचे २४ सप्टेंबरला प्रकाशन; संकेतस्थळाद्वारे जगभरात उपलब्ध
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी द ग्रेट’ या शंभर वर्षे काळाच्या उदरात गडप झालेले शिवचरित्र पुन्हा एकदा कोल्हापुरकरांच्या भेटीला येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास मांडणाऱ्या संबंधित ग्रंथाचे पुनर्संपादन पाच खंडांमध्ये केले आहे. या नव्या स्वरूपातील ग्रंथाचे प्रकाशन २४ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात केले जाणार आहे, अशी माहिती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शककर्ते शिवरायांचा इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी ६६६.२ँ्र५ं्न्र३ँीॅ१ीं३.ूङ्मे या संकेतस्थळाची निर्मिती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुलतान-पंजाबमधील आर्य समाजिस्ट डॉ. बाळकृष्ण यांनी सन १९३२ ते १९४० च्या दरम्यान शककर्ते शिवरायांचे चरित्र ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाने चार खंडांत प्रसिद्ध केले होते. त्यांनी कोल्हापुरात दहा वर्षे राहून या ग्रंथाचे लेखन केले. आधारासह लिहिलेले खंडात्मक व सर्वांत मोठे असे हे पहिले शिवचरित्र ठरले. मात्र, दुर्दैवाने काळाच्या ओघात हे शिवचरित्र विस्मरणात गेले ते इतके की, या चरित्राचे चारही खंड एकत्रित स्वरूपात मिळणे अशक्य झाले. हे चरित्र पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचे काम सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने हाती घेतले.
गेल्या चार वर्षांत देशासह जगातील विविध ग्रंथालयांतून ‘शिवाजी द ग्रेट’ च्या प्रती जशाच्या तशा मिळविल्या. त्यातून नव्याने १६८० पानांच्या पाच खंडांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथाच्या पुनर्संपादनाचे काम पूर्ण केले. त्यातील पहिल्या खंडात शहाजी महाराज यांनी शिवरायांना दिलेली प्रेरणा, राष्ट्राबाबत शिवरायांना असलेला आदर यांची माहिती दिली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या खंडात शिवरायांचे चरित्र, चौथ्या खंडात शिवाजी महाराज यांच्याशी जगातील अन्य कर्तृत्ववान व्यक्तींशी केलेली तुलना, तर पाचव्या खंडात संपादकीय मत व दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश आहे.
या नव्या ग्रंथाचे प्रकाशन २४ सप्टेंबरला कोल्हापुरात करण्यात येईल. हे शिवचरित्र आणि लेखकाची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी ६६६.२ँ्र५ं्न्र३ँीॅ१ीं३.ूङ्मे संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. यावेळी संकेतस्थळाचे उद्घाटन बांधकाम व्यावसायिक संजय शिंदे व आर्किटेक्ट अभिजित जाधव-कसबेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, दिलीप पाटील, हर्षल सुर्वे, राम यादव, सचिन तोडकर, अवधूत पाटील, अक्षय शिंदे, शिरीष जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
असे आहे संकेतस्थळ
या संकेतस्थळासाठी ‘शिवाजी द ग्रेट डॉट कॉम’ हे डोमेन पहिल्याच प्रयत्नात मिळाल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले. ‘ए-लॅब’च्या शिरीष जाधव, अक्षय शिंदे, भास्कर सबनीस व सिद्धी घाडगे यांनी या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. संकेतस्थळाच्या फोटो गॅलरीमध्ये शिवरायांची दुर्मीळ छायाचित्रे, तर व्हिडिओ गॅलरीमध्ये दुर्गाची गाथा आहे. रिसर्च पेपर गॅलरीमध्ये विविध अभ्यासकांचे शोधनिबंध ठेवले जाणार आहेत. ‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथ पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
निर्मिती मूल्यात देणार ग्रंथ
मूळचे मुलतानचे डॉ. बाळकृष्ण हे राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सन १९२२ मध्ये रूजू झाले. प्राचीन भारत, हिंदू संस्कृती, राजकारण आणि अर्थशास्त्रावर लेखन केलेल्या डॉ. बाळकृष्ण यांनी डच, आदी भाषांतील पत्रांच्या आधारे ‘शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथाचे लेखन करून त्यांनी अस्सल, शिवचरित्र मांडले आहे. हा ग्रंथ निर्मिती मूल्यात उपलब्ध करून दिला जाईल. मुखपृष्ठ चित्रकार संजय शेलार यांनी तयार केले आहे. आमदार नीतेश राणे, संजय शिंदे यांनी आर्थिक मदत केली आहे.