नवीन चार आयुक्तालये
By admin | Published: May 3, 2017 03:44 AM2017-05-03T03:44:38+5:302017-05-03T03:44:38+5:30
राज्यात कोल्हापूरसह मीरा-भार्इंदर, अकोला, पिंपरी-चिंचवड या चार ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करावीत, या
कोल्हापूर : राज्यात कोल्हापूरसह मीरा-भार्इंदर, अकोला, पिंपरी-चिंचवड या चार ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करावीत, या मागणीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलीस उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या देशातील दुसऱ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उंच ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळ्यासाठी पोलीस महासंचालक माथूर कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यानी खात्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवटसह सात पोलिसांना अद्याप अटक का नाही? या प्रश्नावर माथूर म्हणाले की, ‘त्या’ पोलिसांच्या वर्तनामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश ‘सीआयडी’ला दिले आहेत. त्यांच्या तपासामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्यास स्पेशल ब्रँचकडून तपास केला जाईल. या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्यातून बडतर्फ केले जाईल. नांदेडपाठोपाठ कोल्हापुरातही ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब
कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील ‘व्हिसेरा’ची चाचणी होत आहे. इमारत आणि निधी अशासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सुसज्ज अशी फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात साकारेल, असेही माथूर यांनी सांगितले.