नव्या पिढीला घडविणारा दस्तऐवज
By admin | Published: May 18, 2015 12:49 AM2015-05-18T00:49:01+5:302015-05-18T00:57:36+5:30
‘एक संघर्ष यात्रा’ : जी. डी. बापू लाड यांच्या आत्मकथन ग्रंथाचे विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर : समाजाला क्रांतीचा संस्कार जी. डी. बापू लाड यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी दिला. बापूंचे आत्मकथन असलेला ‘एक संघर्ष यात्रा’ ग्रंथ हा नव्या पिढीला घडविणारा दस्तऐवज आहे. त्याचे प्रत्येकाने वाचन, मनन आणि चिंतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी रविवारी येथे केले.
येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘जी. डी. बापू लाड : आत्मकथन एक संघर्ष यात्रा’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, आयर्लंडमधील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे सातारा क्रांतीमधील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना घाईला आणले होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबरीने जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी कार्यरत होते. नाना पाटील यांच्या प्रत्येक लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी केलेल्या क्रांतीची ज्वाला नव्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. या पिढीवर क्रांतीचे संस्कार करून त्यांना घडविण्यासाठी बापूंचे आत्मकथन असलेला हा ग्रंथ महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्रत्येकाने तो आपल्या घरात अभिमानाने ठेवला पाहिजे. आत्मकथनाचा उत्तरार्ध क्लेशदायक वाटतो. बापूंसारख्या मोठ्या क्रांतिकारकाला दु:ख सोसावे लागले, हे दुर्दैवी आहे. माजी कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, बापूंचे संघर्षमय जीवन आणि त्यांच्या क्रांतीची वैशिष्ट्ये या ग्रंथातून समजतात. बापूंवर नेताजी सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, आदींच्या विचारांचा प्रभाव होता. तेदेखील यातून समजते. तरुणांना प्रेरणादायी ठरणारे हे आत्मकथन आहे.
कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील, पृथ्वीराज देशमुख, संपतराव पवार-पाटील, योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे, बापूसाहेब पुजारी, सिने-अभिनेते विलास रकटे, व्ही. बी. सायनाकर, डॉ. अरुण भोसले, प्रकाश पवार, भारती पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, बापूसाहेब जाधव, जे. के. पाटील, किरण लाड, वसंत लाड, उदय लाड, कुंडलिक एडके, डॉ. ज. रा. दाभोळे, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, मेघा पानसरे, आदींसह कोल्हापूर, कुंडल, सांगली, सातारा, बेळगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण लाड यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ. प्रकाश कुंभार यांनी ग्रंथाचा परिचय करून दिला. प्रा. व्ही. डी. लाड यांनी संदेशवाचन केले. श्रीकांत माने व ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. वाय. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)