नव्या पिढीने छत्रपतींच्या इतिहासातून प्रेरणा घ़्यावी --: दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:11 PM2019-11-29T12:11:18+5:302019-11-29T12:13:43+5:30

जीवनात ध्येय ठेवल्यास इतिहास घडू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या साहाय्याने ही मोहीम कशी फत्ते केली असेल, याचा सध्याच्या ‘गुगल मॅप’च्या युगात विचार करा.

The new generation should draw inspiration from Chhatrapati's history | नव्या पिढीने छत्रपतींच्या इतिहासातून प्रेरणा घ़्यावी --: दौलत देसाई

कोल्हापुरातील एनसीसी भवन येथून गुरुवारी छत्रपती शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी मार्गस्थ झाली. या तुकडीला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ध्वज दाखवून मार्गस्थ केले.

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज जगातील महान योद्धे आहेत. गनिमी कावा, कुशल युद्धनीतीच्या जोरावर त्यांनी इतिहास घडविला.

कोल्हापूर : औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला उपलब्ध साधनसामग्री आणि काही शेकडो मावळ्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी नामोहरम केले. मराठा साम्राज्य निर्माण करून इतिहास घडविला. नव्या पिढीने इतिहासाचा अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

एनसीसी भवन येथून छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड या छत्रपती शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी मार्गस्थ झाली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. एनसीसी गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. देसाई, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर आर. बी. डोगरा यांनी या तुकडीला ध्वज दाखवून मार्गस्थ केले.

यावेळी देसाई म्हणाले, घनदाट अरण्य, डोंगरवाटा, सतत पडणारा पाऊस आणि तितकाच घनदाट काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत सिद्दी जौहरसारख्या शत्रूला चकवा देत कुशल युद्धनीतीच्या जोरावर आणि अवघ्या काही मावळ्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून आपली सुटका करून घेतली. हा प्रसंग इतिहास घडवून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात साम्राज्य उभे केले. त्यांनी घडविलेला इतिहास छात्रांना प्रेरणा देणारा आहे.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जगातील महान योद्धे आहेत. गनिमी कावा, कुशल युद्धनीतीच्या जोरावर त्यांनी इतिहास घडविला. स्वराज्याचे ध्येय ठेवल्याने हा इतिहास घडला. जीवनात ध्येय ठेवल्यास इतिहास घडू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या साहाय्याने ही मोहीम कशी फत्ते केली असेल, याचा सध्याच्या ‘गुगल मॅप’च्या युगात विचार करा.

या तुकडीमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि गोवा निदेशालयाचे छात्र सहभागी झाले आहेत. कर्नल आर. बी. होला यांनी पदभ्रमण मोहिमेची माहिती दिली. यावेळी निवृत्त कर्नल डी. पी. पी. थोरात, कर्नल राजेश शहा, कर्नल गुलशन चढ्ढा, कर्नल के. के. मोरे, लेफ्टनंट कर्नल सुनील नायर, कॅप्टन अंकुश शर्मा उपस्थित होते.

 

 

Web Title: The new generation should draw inspiration from Chhatrapati's history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.