मंत्र्यांच्या एकमतानंतर येणार नवे अधिष्ठाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:59 AM2020-06-01T10:59:31+5:302020-06-01T11:00:31+5:30
जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जाणे, त्यांनाही तेथे विरोध असल्याने तुम्ही कार्यभार घेऊ नका, अशा त्यांनाही आलेल्या सूचना, त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये येणे या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या एकमतानंतर हे तिघे जे नाव सुचवतील, ते नवे अधिष्ठाता म्हणून कोल्हापूरला रुजू होतील. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीच ही स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे आता हे एकमत जेवढे लवकर होईल, तेवढ्या लवकर नवे अधिष्ठाता रुजू होतील.
कोरोनाचे संकट असताना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना गेले १० दिवस राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा घोळ सुरू आहे. सध्या डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
डॉ. मीनाक्षी गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली, त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती, एकाच रात्रीत रामानंद यांना कोल्हापुरात हजर होऊ नये अशा देण्यात आलेल्या सूचना, डॉ. गजभिये यांचे जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जाणे, त्यांनाही तेथे विरोध असल्याने तुम्ही कार्यभार घेऊ नका, अशा त्यांनाही आलेल्या सूचना, त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये येणे या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.
याबाबत शिवसेनेचेच आरोग्य राज्यमंत्री अशा पेचात अडकवून न घेता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे तिघे जे नाव देतील, त्या आदेशावर माझी सही असेल, अशी ठाम भूमिका घेतल्याचे समजते.
आता वेळ लावू नका
मुश्रीफ, सतेज पाटील आणि यड्रावकर एकाच जिल्ह्यातील आहेत. तीन पक्षांचे हे तीन नेते आहेत. हे सातत्याने गरज पडेल तेव्हा संपर्कामध्ये असतात. त्यामुळे या तिघांनी नावनिश्चितीसाठी अधिक वेळ घेऊ नये, यासाठी यड्रावकर यांनाच पुढाकार घ्यावा लागण्याची गरज आहे. या तिघांनीही तातडीने निर्णय घेऊन नवे अधिष्ठाता मिळवून द्यावेत, अशी अपेक्षा आहे.