चित्रनगरीत नवी लोकेशन्स होणार
By admin | Published: February 16, 2016 12:38 AM2016-02-16T00:38:59+5:302016-02-16T00:53:56+5:30
सात कोटींचा निधी मंजूर : डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
विश्वास पाटील-- कोल्हापूर चित्रनगरीचा चेहरामोहरा बदलू शकेल, अशी कामे कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाने हाती घेतली आहेत. तिथे नव्याने सुमारे १२ ते १४ लोकेशन्स तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांसाठी महामंडळाने आॅनलाईन निविदा मागवल्या आहेत. निविदेची प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.पायाभूत सुविधांच्या कामासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध झाला असला तरी ही चित्रनगरी पूर्ण क्षमतेने सुरू केव्हा होणार, याचीच प्रतीक्षा चित्रपट व्यवसायास गेल्या अनेक वर्षांपासून आहे. जुजबी कामे होतात. परंतु, त्यातून चित्रीकरणास मात्र वेग येत नसल्याचा अनुभव आहे. आता हा अनुभव पुसून नवे काही घडण्याची शक्यता तयार झाली आहे. सध्याच्या चित्रनगरीच्या परिसरात चित्रीकरणासाठी आवश्यक सोयी-सुविधांची वानवा आहे. १९८५ ला बांधलेला पाटलांचा वाडा आहे. परंतु, आता त्यावेळेचा पाटील, तमाशा, लावणी आणि घुंगरू हे मराठी चित्रपटांतून हद्दपार झाले आहे. या चित्रपटांनी आता नवे वळण घेतले आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक लोकेशन्स तिथे उभी करण्याचा प्रयत्न आहे. पाटलाचा वाडा कायम ठेवून त्याचे अंतर्बाह्य रूप बदलण्यात येणार आहे. हा वाडा दुमजली करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर चार लोकेशन्स तयार करण्यात येणार आहेत. कुठूनही कॅमेरा लावला तर वेगळे लोकेशन्स दिसू शकेल. दुसऱ्या मजल्यावर महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. परंतु, ज्यादिवशी मागणी असेल, तेव्हा हे कार्यालयही चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जाईल. रस्ता, पोलीस ठाणे, कोर्ट, गेट, सुरक्षा चौकीपासून स्वच्छतागृहांपर्यंतची व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतींना कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न आहे.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय पाटील म्हणाले, ‘आॅनलाईन निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. २०) प्री-बीड बैठक होत आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत असली तरी एप्रिलपासून प्रत्यक्षात काम सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ही कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावीत, असे टार्गेट घेऊन आम्ही ही कामे करणार आहोत. कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाच्या जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असाच आमचा प्रयत्न आहे.’
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले, ‘निधी मंजूर होतो, त्यातून जुजबी कामे होतात. परंतु, चित्रनगरी पूर्ण क्षमतेने चालू झालेली नाही. ती चालू होणार असे आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून नुसतेच ऐकत आहोत. परंतु, प्रत्यक्षात छोट्या-छोट्या पायाभूत सुविधांचीच वानवा आहे. त्याची तातडीने पूर्तता व्हावी. आजही आम्ही त्यासाठीच बैठक घेतली आहे. चित्रनगरी व चित्रपट महामंडळ यांच्यात समन्वयक असलेले संतोष लेले या बैठकीस उपस्थित आहेत.’
चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर म्हणाले, ‘चित्रनगरीमध्ये लवकरात लवकर चित्रीकरण सुरू होणे हीच आमची सर्वांत प्रमुख मागणी आहे. आता निर्मात्याला पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या वस्तू तिथे घेऊन जाऊन चित्रीकरण करावे लागते. आवश्यक त्या सुधारणा लवकरात लवकर करून चित्रीकरण सुरू व्हावे. येत्या १९ फेब्रुवारीस प्रदर्शित होणाऱ्या ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूरच्याच चित्रनगरीत झाले आहे.