राधानगरी अभयारण्यासाठी आता नवे बोधचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:10+5:302021-02-06T04:42:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राधानगरी अभयारण्याच्या बोधचिन्हावरून निर्माण झालेल्या वादानंतर वन्यजीव विभाग आता नवे बोधचिन्ह निश्चित करत असून ...

New logo for Radhanagari Sanctuary | राधानगरी अभयारण्यासाठी आता नवे बोधचिन्ह

राधानगरी अभयारण्यासाठी आता नवे बोधचिन्ह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्याच्या बोधचिन्हावरून निर्माण झालेल्या वादानंतर वन्यजीव विभाग आता नवे बोधचिन्ह निश्चित करत असून येत्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. यापूर्वीचे बोधचिन्ह अधिकृत मानले जाणार नसून, नव्या बोधचिन्हात राधानगरीच्या वन्यजीवांच्या ठळक वैशिष्ट्यांसह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचा समावेश असेल. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या असणाऱ्या या अभयारण्याला या बोधचिन्हामुळे स्वतंत्र ओळख मिळणार आहे.

राधानगरी अभयारण्य हे पर्यटनाचे प्रतीक मानून कोल्हापूर वन्यजीव विभागाने १७ सप्टेंबर २0२0 रोजीच्या पत्रानुसार खुली बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १0८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्राथमिक स्तरावर मुंबईचे संजयकुमार दरमावर, प्रसन्न जगताप आणि कोल्हापूरच्या निर्मिती ग्राफिक्स यांच्या बोधचिन्हांची निवड केली होती. या स्पर्धेतील बोधचिन्हांचे प्रदर्शनही वन्यजीव विभागाने कोल्हापुरात भरवले होते.

दरम्यान, वन्यजीव विभागाने निवडलेल्या बोधचिन्हांत इंग्रजी शब्दांचे चुकीचे स्पेलिंगचा वापर झाल्याने तसेच राधानगरी अभयारण्याचे वैशिष्ट्य ठळकपणे स्पष्ट होत नसल्याने यापूर्वीचे बोधचिन्ह अखेर वन्य विभागाने रद्द केले आहे. निवड समितीमार्फत आता नव्या बोधचिन्हाची निवड अंतिम टप्प्यात आली असून, त्यात राधानगरी अभयारण्याच्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वन्यजीव संरक्षक क्लेमेन्ट बेन, कोल्हापूर वन्यजीवचे मुख्य वन्यजीव रक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेरिटेज समितीचे अध्यक्ष अमरजा निंबाळकर, पर्यावरण तज्ज्ञ जय सामंत, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, दळवीज्‌ आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, कलाविशेषज्ञ म्हणून रमण कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ संजय करकरे यांची समिती या नव्या बोधचिन्हांचे मूल्यांकन करत आहे.

असे असेल नवे बोधचिन्ह : नव्या बोधचिन्हात राधानगरीचे वन्यजीव गवा, शेकरू, बिबट्या, पक्षी अभयारण्यातील किंगफिशर, हॉर्नबिल, कबुतर, संकटग्रस्त लावा आदी पक्षी, जांभूळ, अंजनी, कारवीची फुले यासारख्या दुर्मिळ वनस्पतींची जैवविविधता, सह्याद्रीतील डोगरकपारी, फुलपाखरांचा वावर, यासोबत शिवगड आणि राधानगरी धरण बांधणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचा समावेश असणार आहे. राधानगरी अभयारण्याच्या १९५८ पासूनच्या अस्तित्वाचाही विशेष उल्लेख यात असणार आहे.

कोट

राधानगरी अभयारण्याची ओळख दर्शविणारे नवे बोधचिन्ह येत्या आठवडाभरात निश्चित होईल. यापूर्वी निवडलेल्या तीन स्पर्धकांच्या कलाकृतीऐवजी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनीच पाठविलेल्या बोधचिन्हांतून नवे अधिकृत बोधचिन्ह निवडले जाणार आहे.

Web Title: New logo for Radhanagari Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.