तीन कोटींच्या फसवणूक प्रकरणी न्यू महाराष्ट्र ग्रॅनाईटच्या संचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:47 PM2021-02-02T21:47:02+5:302021-02-02T21:48:10+5:30
Crime News Police Kolhapur- साजणी (ता. हातकणंगले) येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेच्या नावाखाली शासनाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला होता. या फसवणूक प्रकरणी संस्थेचा फरार संचालक कुमार आकाराम कांबळे (रा. रुई, ता. हातकणंगले) याला मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने अटक केली. त्याला इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापूर : साजणी (ता. हातकणंगले) येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेच्या नावाखाली शासनाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला होता. या फसवणूक प्रकरणी संस्थेचा फरार संचालक कुमार आकाराम कांबळे (रा. रुई, ता. हातकणंगले) याला मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने अटक केली. त्याला इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
साजणी (ता. हातकणंगले) येथे न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्था हे युनिट २००९ मध्ये सुरू केले होते. शासनाकडून सुमारे तीन कोटी रुपयांहून जादा अनुदान घेऊन हे युनिट सुरू झाले होते. पुढे ते बंद पडले. शासनाच्या वतीने लेखापरीक्षकांनी या संस्थेचे २०१० ते २०१८ या कालावधीचे लेखापरीक्षण केले.
त्यामध्ये शासनाची तीन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यामुळे शासनाच्या वतीने संस्थेचे चेअरमन तुळशीदास देसाई-कांबळे, सचिव अरविंद मुरुडकर व संचालक कुमार कांबळे यांच्याविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गतवर्षी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला; पण संशयित आरोपी फरार होते.
दरम्यान, साजणी येथील बंद पडलेल्या युनिटचा ताबा पोलिसांनी पंचनामा करून सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सुपूर्द केला. संशयित आरोपी कुमार कांबळे याने इचलकरंजी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याच वेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस हवालदार दिनेश उंडाळे हे संशयिताच्या मागावरच होते.
या पोलीस पथकाने सायबर विभागाची मदत घेऊन संशयित आरोपीला शोधण्यासाठी इचलकरंजी, सांगली, मिरज भाग पिंजून काढला. मंगळवारी पहाटे त्याला जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने पकडले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.