अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी नवी यंत्रणा
By admin | Published: August 1, 2016 12:29 AM2016-08-01T00:29:12+5:302016-08-01T00:29:12+5:30
पाच बंदूकधारी रक्षक : १२ महिलांसह ५२ जणांची आजपासून नेमणूक
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही कंबर कसली आहे. पूर्वीच्या कंपनीचा करार रविवारी संपुष्टात आल्यामुळे नवीन प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक आज, सोमवारपासून केली जाणार आहे. त्यात ४० पुरुष, तर १२ महिला सुरक्षा रक्षक आहेत.
गेली काही वर्षे दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर राज्यातील मोठी मंदिरे आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेले करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दररोज लाखो भाविक भेट देतात. त्यामुळे या भाविकांच्या व मंदिराच्या सुरक्षेसाठी देवस्थान समितीने यापूर्वी ४३ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. या सुरक्षा रक्षकांची मुदत रविवारी, (दि. ३१ जुलै) संपुष्टात आली. त्यामुळे देवस्थान समितीने महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यताप्राप्त असलेल्या कोल्हापूर सुरक्षा बोर्डाकडून एकूण ५२ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार हे सुरक्षा रक्षक सोमवारी (दि. १) पासून कार्यभार घेणार आहेत. त्यामध्ये ५ बंदूकधारी सुरक्षा रक्षक सध्या उपलब्ध नसल्याने यापूर्वीच्याच पाच बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची तात्पुरती नेमणूक केली जाणार आहे.
या सर्व सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जाणार आहे. हे सर्वजण मोठी आपत्ती आल्यानंतर त्याला तोंड देण्यासाठी प्रशिक्षितही केले आहेत. त्यानुसार त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच बोर्डाकडून घेण्यात आले आहे. तीन शिफ्टमध्ये हे सर्वजण काम करणार असून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी एक सुपरवायझरचीही नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस दलाकडून मंदिराच्या चारही दरवाजांवर २४ तास कडक पहारा ठेवण्यात येत आहे.
मागील सुरक्षा रक्षकांची मुदत ३१ जुलैला संपुष्टात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर सुरक्षा बोर्डाकडून ४० पुरुष व १२ महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक आज, सोमवारपासून केली आहे. हे सर्व सुरक्षा रक्षक प्रशिक्षित असून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जाणार आहे. त्यात पाच बंदूकधारी सुरक्षा रक्षक सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे यापूर्वीच्याच पाच बंदूकधारी सुरक्षा रक्षकांना तात्पुरते कामावर घेतले जाणार आहे.
- शुभांगी साठे, सचिव,
प. महाराष्ट्र देवस्थान समिती,