हद्दवाढीचा नवा प्रस्ताव मंजूर
By admin | Published: June 12, 2015 12:57 AM2015-06-12T00:57:30+5:302015-06-12T00:58:47+5:30
महापालिका विशेष सभा : १५ दिवसांत हद्दवाढ करा, अन्यथा आंदोलन - नगरसेवकांचा इशारा
कोल्हापूर : शिरोली व गोकुळ शिरगाव एमआयडीसींसह २० गावांच्या सुधारित हद्दवाढीच्या प्रस्तावास गुरुवारी महापालिकेच्या विशेष सभेत मंजुरीची मोहोर उमटली. यावेळी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भांडवलासाठी हद्दवाढीचे गाजर शासनाने दाखवू नये. देवेंद्र फडणवीस सरकारने येत्या १५ दिवसांत हद्दवाढीची अधिसूचना जारी करावी. हद्दवाढीसाठी प्रशासनाला राजकीय पाठबळ देण्यासाठी प्रसंगी सर्व नगरसेवक राजीनामा देतील. हद्दवाढीचा निर्णय तत्काळ न झाल्यास लोकचळवळ उभारण्याचा निर्धार यावेळी सभागृहाने एकमुखाने केला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.
गेली ६० वर्षे कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. आता होणाऱ्या हद्दवाढीनंतर पुन्हा हद्दवाढीची संधी कधी मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्व तांत्रिक बाजूंचा अभ्यास करूनच प्रशासनाने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशी मागणी निशिकांत मेथे यांनी सभेच्या सुरुवातीस केली. गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसींतील सर्व कारखाने व युनिटस्चा हद्दवाढीत समावेश करावा, यासाठी १९७८च्या एमआयडीसी अधिनियमनाचा आधार घ्या. एकही कारखाना यातून सुटता कामा नये, अशी खबरदारी घेण्याची सूचना उपमहापौर मोहन गोंजारे, राजेश लाटकर, सचिन चव्हाण, भूपाल शेटे, प्रकाश नाईकनवरे यांनी केली. यावर, दोन्ही एमआयडीसींतील ार्व कारखाने व जमीन नव्या प्रस्तावात नमूद केल्याचे सहायक संचालक नगररचना डी. एस. खोत यांनी सभागृहास सांगितले.
हद्दवाढ होणार-होणार, असे म्हणत कोल्हापुरातील दोन पिढ्या संपल्या. गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारला हद्दवाढ करण्याची सुबुद्धी सुचली नाही. मागील वेळीप्रमाणे आताही हद्दवाढीस विरोध होत आहे. याच शासनाने ‘गावांचा विरोध’ हे कारण सांगत चार महिन्यांपूर्वीच हद्दवाढ नाकारली आहे. असे झाले नसते तर आतापर्यंत हद्दवाढीचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले असते. आता नव्याने प्रस्ताव घेऊन हद्दवाढ करताना शासनाने येणाऱ्या गावांना काय-काय देणार, याचा ऊहापोह करावा, १५ दिवसांत अधिसूचना काढावी, नाही तर महापालिका ‘अ’ वर्ग नगरपालिके त समाविष्ट करावी, अशी जोरदार मागणी राजेश लाटकर यांनी केली. हद्दवाढ न झाल्यास लवकरच लोकआंदोलन उभारण्याची घोषणा लाटकर यांनी केली. यास सर्व नगरसेवकांनी बाके वाजवून, तसेच ‘हद्दवाढ झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत संमती दिली. (प्रतिनिधी)
कलगीतुरा
गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसींतील सर्व कारखाने हद्दवाढीत आलीच पाहिजेत, अशी जोरदार मागणी भूपाल शेटे यांनी केली. यावेळी शेटे यांना ‘सर्व कारखाने येतील’, असे संभाजी जाधव यांनी सांगितले. ‘जाधव साहेब...तुमचा कारखाना तर पहिल्यांदाच घेणार’, असे शेटे यांनी दोन-तीन वेळा भाषणातून बजावले. यानंतर चिडलेल्या जाधव व शेटे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यानंतर नगरसेवकांनी हस्तक्षेप करीत दोघांनाही शांत केले.
दोन एमआयडीसींसह २० गावे
हद्दवाढीच्या सुधारित प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, शिंगणापूर, वाडीपीर, मोरेवाडी, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, शिरोली, उचगाव, गोकुळ शिरगाव, नागाव, गडमुडशिंगी, गांधीनगर-वळिवडे, गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसी यांचा समावेश आहे.