भाजपच्या जुळवाजुळवीने नवे राजकीय ध्रुवीकरण शक्य

By admin | Published: October 22, 2016 01:12 AM2016-10-22T01:12:19+5:302016-10-22T01:21:42+5:30

समरजित यांचा भाजप प्रवेश : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समितीसह सर्व निवडणुकांमध्ये पडसाद उमटणार

New political polarization can be possible with BJP's match-fixing | भाजपच्या जुळवाजुळवीने नवे राजकीय ध्रुवीकरण शक्य

भाजपच्या जुळवाजुळवीने नवे राजकीय ध्रुवीकरण शक्य

Next

विश्वास पाटील -- कोल्हापूर  कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाने कागल तालुक्याचे राजकारण तर ढवळून निघणारच आहे परंतु त्यासोबत जिल्ह्णाच्या राजकारणालाही उसळी येण्याची चिन्हे आहेत. या घडामोडींचे पडसाद विधानसभा व थेट लोकसभा निवडणुकीत उमटणार आहेत. तूर्त आज तरी घाटगे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ तालुक्याच्या राजकारणात एकाकी पडल्याचे
चित्र पुढे आले आहे. या राजकीय उलथापालथीचा परिणाम काय
होतो हे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत अनुभवण्यास येणार आहे. तीच राजकारणाची लिटमस टेस्ट ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्णाच्या राजकारणात भूकंप घडवून आणणार आहे, असे जाहीर केले होते. पत्रकारांचा विश्वास बसणार नाही, अशी व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे दादांनी सांगितले होते. त्यांचा रोख समरजित यांच्या दिशेनेच होता हे आता त्यांच्या भाजप प्रवेशावरून स्पष्ट झाले. समरजित घाटगे यांना तशी कारखान्याची सत्ता व राजकीय स्वतंत्र भूमिका या वर्षातच मिळाली. विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर शाहू समूहाची सूत्रे त्यांच्याकडे आली. विक्रमसिंहराजें यांनीही राजकारणात अनेक ऊन-पावसाळे पाहिले, त्याला समर्थपणे तोंड दिले; परंतु लोकसभेच्या १९९८ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी गट म्हणून आक्रमकता सोडून सामंजस्याची भूमिका घेतली. ‘शाहू आघाडी’च्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या राजकारणातही काही चांगला पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे विक्रमसिंह घाटगेंच्या निधनानंतर समरजित ‘शाहू’ला कसे पुढे नेतात व राजकीय भूमिका काय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यांनी सुरुवात तर एकदम आक्रमकच केली आहे. कारखाना म्हणून ‘शाहू’च्या विकासाबद्दलची दूरदृष्टीही स्पष्ट आहे. समरजित यांना राजकीय करिअर सुरू झाल्यापासून आता ‘भाजपचे नेते’ म्हणून प्रथमच राजकीय ओळख मिळत आहे. कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांनी झाली तर बिनविरोध नाही तर लढायला तयार, अशी
भूमिका घेतली. एका जागेसाठीही त्यांनी तडजोड केली नाही. निवडणूक ही संधी मानून सभासदांशी
संवाद साधला व ते त्यास सामोरे गेले. आता काही लोक असे म्हणतात की, त्यांनी कारखान्याची निवडणूक सोडवून घेतली आणि मग
भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला; परंतु जरी निवडणूक लागली असती
आणि प्रस्थापित नेते उघडपणे, छुप्यारितीने विरोधात गेले असते तर जास्त राबावे लागले असते परंतु निकाल बदलला नसता, हे
देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे कारखाना बिनविरोध करून दिल्याचे भांडवल करून त्यावर कुणी आपली राजकीय पोळी भाजू नये, असा त्यांचा प्रयत्न राहिला व त्यात ते यशस्वी झाले.
देशाच्या व राज्याच्या राजकारणातही भाजपचा अजून किमान दहा वर्षे तरी दबदबा राहू शकतो. त्यामुळे तेवढ्यात आपले नेतृत्व फुलू शकते असाही
त्यांच्या भाजप प्रवेशामागे विचार आहे. भाजपकडेही सहकारात काम करणारी चांगले माणसे नव्हती. त्यांनाही एका चांगल्या ‘सहकार समूहाचा नेता भाजपचा नेता’ असल्याचा राजकीय फायदा होऊ शकतो. छत्रपती संभाजीराजे यांना भाजपमध्ये घेताना ‘शाहू घराण्याचा वारसदार’ ही मोठी जमेची बाजू
होती. समरजितसिंह हे देखील शाहूंच्या जनक घराण्याचे थेट वारसदार आहेत

कागलच्या राजकारणाची दिशा ठरणार
समरजितराजे भाजपमध्ये गेल्याने कागलच्या राजकारणात नक्की काय उलथापालथी घडतील याबद्दल जिल्ह्याला औत्सुक्य आहे. आता जे घडते आहे, त्यावरून असे दिसते की, संजय घाटगे हे जरी आता शिवसेनेत असले तरी ते देखील भाजपमध्ये जाऊ शकतात. व तेच भाजपचे विधानसभेचे उमेदवार असतील. समरजित यांना आमदारकीपूर्वीच राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पुणे म्हाडाचे अध्यक्षपद मिळेल. पुढे संधी मिळेल तेव्हा भाजपकडून विधान परिषदेच्या आमदारकीवर त्यांचा क्लेम असेल. विधानसभेला मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे ही पुन्हा पारंपरिक लढत होईल व भाजपने आता केलेल्या जोडण्या त्यावेळी फायदेशीर ठरू शकतील. गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांना उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाने तारले. आता त्या तालुक्यातही चंद्रकांतदादा यांनी सुरूंग लावला आहे. गडहिंग्लज नगरपालिकेतही राष्ट्रवादीची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत मुश्रीफ एकाकी व अडचणीत असल्याचे स्पष्टच दिसते परंतु विधानसभेला अजून किमान तीन वर्षांच्या अवधी आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी जाणार आहेच, शिवाय त्यापूर्वी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यात काय घडते त्यावरही कागलच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Web Title: New political polarization can be possible with BJP's match-fixing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.