वस्त्रनगरीसमोर नवीनच समस्या
By admin | Published: September 18, 2015 09:59 PM2015-09-18T21:59:40+5:302015-09-18T23:35:20+5:30
डोअर डिलिव्हरी बंद : वाहतूकदार संस्था; हमाल संघटनातील हमाली वाढीच्या वादाचा परिणाम
इचलकरंजी : वाहतूकदार संस्था व हमाल संघटना यांच्यातील हमाली वाढीच्या प्रश्नावर असलेल्या वादातून हमाल संघटनेने सुताच्या बाचक्यांची डोअर डिलिव्हरी देण्याचे बंद केल्यामुळे येथील वस्त्रोद्योगात नवीनच समस्या निर्माण झाली आहे. हमाल वाढीचा वाद आणि यंत्रमाग उद्योजक व व्यापारी वेठीस धरला जात असल्याबद्दल शहरात खळबळ उडाली आहे.
हमाली वाढीबाबत वाहतूकदार संस्था व हमाल संघटना यांच्यात प्रत्येक तीन वर्षांनी करार होत असतो. कराराची मुदत दोन महिन्यांपूर्वी संपल्यामुळे हमाल संघटनेने वाहतूकदार संस्थांच्या असोसिएशनकडे हमाली वाढीची मागणी केली आहे.
याबाबत सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये चार बैठकाही झाल्या आहेत. मात्र, योग्य असा तोडगा निघालेला नाही. परिणामी हमाल संघटनेने सूत बाचक्यांची डोअर डिलिव्हरी देण्याचे गेल्या आठवड्याभरापासून बंद केले आहे.
यंत्रमागधारक व कापड व्यापारी कापड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुताची खरेदी करतात. शहरामध्ये लागणाऱ्या सुतापैकी सुमारे ८० टक्के सूत दक्षिण भारतातील तमिळनाडू व आंध्र प्रदेशातून येते. सदरचे सूत संबंधित सूतगिरण्यांकडे खरेदी
करून त्याची डिलिव्हरी इचलकरंजीमध्ये पोहोच करण्यासाठी बुकिंग केले जाते. त्याप्रमाणे यापूर्वी एकाच मालगाडीतून आलेला माल मागणीप्रमाणे पाच-सहा ठिकाणी संबंधित खरेदीदाराच्या पत्त्यावर उतरला जात असे. आता मात्र हमाल संघटनांनी डोअर डिलिव्हरी बंद केल्यामुळे यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अन्य उद्योगधंद्यामध्ये डोअर डिलिव्हरीची प्रथा चालू असताना सुतासाठी ती बंद करण्यात आल्याने येथील वस्त्रोद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
आजच्या बैठकीत विचार होण्याची मागणी
हमाली वाढीबाबत आज, शनिवारी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी ट्रान्स्पोर्ट असोसिएशन व हमाल संघटना कृती समिती यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये डोअर डिलिव्हरी या नवीनच उद्भवलेल्या समस्येचा विचार व्हावा. ज्यामुळे यंत्रमागधारक व कापड व्यापारी भरडले जाऊ नयेत, अशी अपेक्षा यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केली आहे.