जिल्ह्यातील २६ गावांमध्ये नवीन रेशन धान्य दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:20+5:302021-08-26T04:25:20+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यामधील करवीर, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, आजरा या तालुक्यांमधील २६ गावांमध्ये नवीन रेशन दुकान सुरू करण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर : जिल्ह्यामधील करवीर, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, आजरा या तालुक्यांमधील २६ गावांमध्ये नवीन रेशन दुकान सुरू करण्यात येणार आहेत. या गावांतील नागरिकांना आजवर शेजारच्या गावात जावून रेशन धान्य खरेदी करावे लागायचे. आता त्यांच्याच गावात दुकान सुरू होणार असल्याने नागरिकांची साेय झाली आहे. यासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
पन्हाळा तालुक्यातील गुडे / सोमवार पेठ, नावली, मौ. बहिरेवाडी, पिंपळे तर्फ सातवे, मौजे कोतोली व वारणा. कागलमधील बोरवडे, माद्याळ व पिंपळगाव खुर्द. करवीरमधील शिरोली दुमाला, येवती, खेबवडे व गर्जन, कळंबे तर्फ कळे, घानवडे, सोनतळी व वसगडे. शाहूवाडीतील मोळावडे, वडगाव, करंजोशी, ओकोली व कोळगाव. आजऱ्यातील दाभिळ.गगनबावडा-पळसंबे, तळये बु. व खोकुर्ले या २६ गावांमध्ये नवीन रास्त भाव धान्य दुकान सुरू करण्यात येणार आहे.
या गावांमध्ये रेशन दुकान नसल्याने येथील नागरिकांना धान्य खरेदीसाठी शेजारच्या गावात जावे लागायचे. आता ही गैरसोय थांबणार आहे. संस्थांनी अर्ज करण्यासाठीच्या पात्रतेचे निकष व अटी, शर्ती संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती, गावचावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तरी इच्छुकांनी त्यानुसार अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.
---
वेळापत्रक असे
संस्थांना अर्ज करण्यास मुदत : २० सप्टेंबरपर्यंत.
अर्जाची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही : २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर.
नवीन दुकाने मंजुर करणे : २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
-----