पश्चिम घाटात सापडली बेगोनिया वनस्पतीची नवीन जात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:46 PM2019-11-12T16:46:26+5:302019-11-12T16:49:15+5:30

हंडीबडगनाथ मठ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे कोल्हापुरातील तीन वनस्पतितज्ज्ञांनी बेगोनिया वनस्पतीच्या नवीन जातीचा शोध लावला. ‘पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास’ या पीएच. डी.च्या कामाचे संशोधन करीत असताना डॉ. मकरंद मो. ऐतवडे तसेच त्यांचे मार्गदर्शक वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि डॉ. एम. वाय. बाचूळकर यांनी या नवीन जातीचा शोध लावला आहे.

A new species of Begonia plant found in the Western Ghats | पश्चिम घाटात सापडली बेगोनिया वनस्पतीची नवीन जात

हंडीबडगनाथ मठ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे ‘बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस’ ही वनस्पती.

Next
ठळक मुद्देपश्चिम घाटात सापडली बेगोनिया वनस्पतीची नवीन जातकोल्हापुरातील तीन वनस्पतितज्ज्ञांचे संशोधन

कोल्हापूर : हंडीबडगनाथ मठ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे कोल्हापुरातील तीन वनस्पतितज्ज्ञांनी बेगोनिया वनस्पतीच्या नवीन जातीचा शोध लावला. ‘पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास’ या पीएच. डी.च्या कामाचे संशोधन करीत असताना डॉ. मकरंद मो. ऐतवडे तसेच त्यांचे मार्गदर्शक वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि डॉ. एम. वाय. बाचूळकर यांनी या नवीन जातीचा शोध लावला आहे.

बेगोनिएसी कुळातील बेगोनिया या जातीतील वनस्पती जगभरात शोभिवंत वनस्पती म्हणून सर्वज्ञात आहेत. साधारणपणे जगभरात बेगोनियाच्या दहा हजार जाती लागवडीखाली आहेत. याबरोबरच यांचे अनेक जंगली, लागवडीखालील आणि संकरित वाण शोभिवंत, खाद्य आणि औषधी गुणधर्मांचे आहेत.

व्यावसायिक युरोप, जपान, अमेरिका आणि आॅस्ट्रेलिया हे देश बेगोनियाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी अग्रेसर आणि पारंगत आहेत. भारतामध्ये या कुटुंबामध्ये बेगोनिया ही एकाच प्रजात असून त्यात ५७ जाती नोंदविल्या आहेत. यांपैकी सर्वाधिक जाती हिमालयामध्ये आणि इतर जाती पश्चिम घाटामध्ये आढळून येतात.

या तिघांना आॅक्टोबर २०१४ साली बेगोनियाची एक जात आढळून आली. या वनस्पतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, भारतामध्ये ही एकमेव अशी वनस्पती आहे, जिच्या पानांच्या बगलेमध्ये गुलिका अर्थात ट्युबरकल आहेत.

पुढील संशोधनात ही जात नवीनच असून पश्चिम घाटातीलच बेगोनिया डायपेट्याला या जातीशी आप्तभाव दर्शविते, असे आढळून आले. पश्चिम घाटातील कर्नाटक राज्यातील हंडीबडगनाथ येथून ही जात शोधली असून तिचे नामकरण ‘बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस’ असे तिच्या मूळ स्थानावरून केले गेले आहे. या संशोधनामध्ये डॉ. यू. एस. यादव, डॉ. नीता जाधव, अरुण जाधव आणि डॉ. एस. एस. कांबळे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.

उंची शंभर सें.मी.

बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस ही वनस्पती साधारणपणे १०० सें. मी. उंच, दगडांच्या फटींमध्ये वाढते. खोड नागमोडी, हिरवे असून त्यावर गुलाबी ठिपके असतात. पाने उपपर्णयुक्त असून ती लांबट-अंडाकृती, रोमयुक्त, कडा दंतुर असून तळ तिरकस, बदामाकृती आणि टोके अणकुचीदार असतात. पानांच्या बगलेत गुलिका असतात. पुष्पविन्यास हा फांद्यांच्या बगलेत येत असून एकाच फुलोऱ्यात मोठी, टपोरी, फिकट गुलाबी रंगाची नर आणि मादी फुले येतात.


शोभिवंत वनस्पतींमध्ये गणल्या जाणाºया तसेच लुप्त होत चाललेल्या बेगोनियाच्या भारतीय जातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. श्रीरंग यादव


पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध आहे. अनेक नवीन वनस्पतींचे शोध अलीकडच्या काळात पश्चिम घाटामधून लागले आहेत. पश्चिम घाटाचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. मधुकर बाचूळकर


बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस या वनस्पतीची फुले देखणी आहेत. तसेच नैसर्गिकरीत्या गुलिकांद्वारे तिचे सहज शाकीय प्रजनन होते. या कारणांमुळे ही वनस्पती व्यावसायिकदृष्ट्या शोभिवंत म्हणून प्रसिद्धीस येऊ शकते.
- डॉ. मकरंद ऐतवडे

 

 


 

 

Web Title: A new species of Begonia plant found in the Western Ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.