नवीन प्रजातीच्या रंगीत पालीला संशोधकाच्या वडिलांचे नाव, तामिळनाडूत घनदाट जंगलात आढळली पाल
By संदीप आडनाईक | Published: November 7, 2023 03:18 PM2023-11-07T15:18:21+5:302023-11-07T15:48:24+5:30
कोल्हापूर : वन्यजीव संशोधकांना एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामिळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाममधील उंच डोंगररांगांमधील घनदाट ...
कोल्हापूर : वन्यजीव संशोधकांना एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामिळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाममधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करणारे सातारचे संशोधक अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे प्रो. रशिद सैय्यद यांचे नाव दिले आहे. या पालीला आता ‘निमास्पिस रशिदी’ या नावाने ओळखले जाईल.
अमित सैय्यद आणि त्यांच्या टीमचे दोन सहकारी समुद्रसपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या तामिळनाडूच्या डोंगरभागातील घनदाट जंगलात २०१३ पासून पालींवर संशोधनाचे काम करत आहेत. हे जंगल हे लहान, मोठ्या विविध हिंस्र प्राण्यांनी भरलेले आहे. ज्या भागात त्यांची शोधमोहीम सुरू होती, तेथे पाण्याची, खाण्याची, राहायची साेय नाही. तिथे मोबाइलला कोणतेच नेटवर्क मिळत नाही. पाऊस आला की झाडाखाली थांबायचे, भूक लागल्यावर सोबत नेलेल्या जेवणाच्या साहित्यावर गुजराण करावी लागे.
वाघ, अस्वल आणि जंगली हत्तीसारख्या प्राण्यांच्या अधिवासात त्यांनी काम केले. अमित यांच्या परिश्रमाला २०१५ मध्ये अखेर यश आले आणि या नव्या रंगीत पालीचा शोध लागला. या पालीवर प्रयोगशाळेत संशोधन करून त्याच्या सर्व अवयवांचा, त्याच्यावर असणाऱ्या खवल्यांचा तसेच जनुकीय अभ्यास अमित यांनी पूर्ण केला. शास्त्रीय अभ्यासातून ही पाल नवीन असून, वन्यजीवशास्त्रात याची अद्यापी नोंदच झाले नसल्याचा दाखला मिळाला.
आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत माहिती प्रसिद्ध
अमित सैय्यद यांनी या पालीला त्यांचे वडील प्रो. रशिद सैय्यद यांचे नाव दिले. त्यामुळे या पालीला ‘निमास्पिस रशिदी’ या नावाने आता ओळखले जाईल. ‘एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संशोधनपत्रिकेत रविवारी या पालीची माहिती प्रसिद्ध झाली.
विविध रंगछटांची पाल
‘निमास्पिस रशिदी’ ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या रंगछटांमुळे अतिशय सुंदर दिसते. या संशोधनासाठी अमित सैय्यद यांच्यासह सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, अयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे यांनीही भाग घेतला.