कॉँग्रेसअंतर्गत वर्चस्ववादाची नवी कहाणी

By admin | Published: November 5, 2016 11:26 PM2016-11-05T23:26:32+5:302016-11-06T00:39:55+5:30

दोन घराण्यांचा संघर्ष : सांगली जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटांच्या राजकारणाला महत्त्व

A New Story of Verticalism Under Congress | कॉँग्रेसअंतर्गत वर्चस्ववादाची नवी कहाणी

कॉँग्रेसअंतर्गत वर्चस्ववादाची नवी कहाणी

Next

अविनाश कोळी -- सांगली -पक्षांतर्गत वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा... राजकारणातील ‘अर्थ’पूर्ण अपेक्षा आणि संघर्षाचे जुने हिशेब चुकते करण्याची मानसिकता घेऊन काँग्रेसमधील गटबाजी कार्यरत झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आलेल्या संघर्षाला अशा अनेक व्यक्तिगत कारणांनी ग्रासले आहे. कदम आणि दादा घराण्यांमधील संघर्षाची नवी कहाणी वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच लिहिली जात असल्याने प्रामाणिक व निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.
कॉँग्रेसअंतर्गत संघर्षाला जुना इतिहास आहे. सातारा जिल्हा लोकल बोर्डाच्या १९४६ च्या निवडणुकीपासून पक्षांतर्गत संघर्षाच्या अनेक कहाण्या लिहिल्या गेल्या. महापालिकेच्या २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता गटबाजी, फुटीरता, स्वकीयांचे कुरघोड्यांचे राजकारण, बंडखोरी या गोष्टींनी कधीही कॉंग्रेसची पाठ सोडली नाही. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यालाही व्यक्तिगत राजकारणातून जन्मलेल्या संघर्षाने सोडले नाही. राजकारणातील भाऊबंदकीचे दर्शन संपूर्ण राज्याला झाले. हीच परंपरा आजही कायम आहे. वसंतदादांचे नातू विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्या गटातील वाद राज्याच्या वेशीला टांगला गेला. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असतानाच जिल्ह्यातही कॉंग्रेसअंतर्गत दोन गटांची वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आहे.
वसंतदादा आणि कदम घराण्यातील संघर्ष जुना असला, तरी गत महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याला पूर्णविराम मिळाल्याचे दर्शविण्यात आले होते. मदनभाऊ पाटील गटाचे सूर कदम यांच्याशी जुळले. आजही ते कायम आहेत, मात्र माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्याशी कदम घराण्याचे आणि मदनभाऊंच्या गटाचे सूर कधीच जुळले नाहीत. मदनभाऊंच्या पश्चात महापालिकेतील कॉंग्रेसचे नेतृत्व पतंगराव आणि विश्वजित कदम यांच्या हाती गेले. विशाल पाटील यांनी लगेच दुसऱ्या गटाची स्थापना करून अस्तित्वाच्या लढाईचे रणशिंग फुंकले. महापालिकेत सुरू झालेली पक्षांतर्गत गोंधळाची स्थिती ‘व्हायरल’ होत आता जिल्ह्याभर गेली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेला हा संघर्ष टोकाला गेला आहे. एक-दोन दिवसात बंडखोरीचे वादळ शांत होण्याचा आशावाद अजूनही कॉंग्रेस नेत्यांनी जपला असला, तरी निवडणुकीसाठीची ती तात्पुरती तडजोड ठरणार आहे.
संघर्षाचे वादळ पडद्याआड घोंगावत राहणार आणि निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा मैदानात उतरणार, हे निश्चित. हिशेब चुकते करण्यासाठी गटांचे नेते भविष्यातील संधीच्या शोधातही राहणार आहेत.


निवडणुकांमध्ये कळ : महत्त्व वाढविण्यासाठी
लोकसभेच्या एका निवडणुकीत प्रतीक पाटील आणि विश्वजित कदम यांच्यात संघर्ष झाला होता. कदम यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. ऐनवेळी कॉंग्रेस नेत्यांनी पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी विश्वजित कदम यांची समजूत घातली होती. त्यावेळी कदम यांनी पक्षीय आदेशाला प्रतिसाद देत माघार घेतली होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही मदन पाटील यांच्याविरोधात दादा गटातीलच नेत्यांनी राजकारण करून दिगंबर जाधव यांच्या बंडखोरीला बळ दिले होते. निवडणुकांच्या माध्यमातून एकमेकांची कळ काढण्याचा पायंडाही कॉंग्रेसमध्येच पडलेला आहे.


अंधारातील अस्तित्वाची लढाई
मदनभाऊंच्या पश्चात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा गट सध्या जयश्रीताई मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. विशाल पाटील गटाने प्रयत्न करूनही मदनभाऊंचे कट्टर समर्थक फुटले नाहीत. तरीही राजकारणाच्या दूषित वातावरणाने हे कार्यकर्ते सध्या नैराश्येच्या अंधारात चाचपडत आहेत. हा गट फोडून भविष्यात महापालिका क्षेत्रावर वर्चस्व प्राप्त करण्याचा मनसुबा विशाल पाटील गटाचा आहे. मदनभाऊंसारखी सर्वसमावेशक राजकारण करण्याची किमया अद्याप कोणालाही साध्य करता आली नाही. त्यामुळेच गटांचे राजकारण करणारे नेतेही सध्या अस्तित्वाची अंधारातील लढाई लढत आहेत.


जयंत पाटील गटाची फोडणी
दादा घराण्याअंतर्गत असलेला वाद किंवा कदम-दादा गटातील संघर्षाला वेळावेळी जयंत पाटील गटाने फोडणी देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. त्यांनीही अस्तित्वाच्या राजकारणाचा तो एक भाग मानला आहे.
सांगली-सातारा विधानपरिषदेच्या रिंगणात कॉंग्रेसचे शेखर माने यांनी ऐनवेळी बंडखोरीचे निशाण खाली उतरविण्याचा प्रयत्न केल्यानंतर जयंत पाटील यांच्या निकटवर्तीय नेत्याने आधार देत निशाण फडकवत ठेवण्यासाठी प्रोत्साहीत केले.
गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील गटाने सांगली जिल्ह्यात विशेषत: महापालिका क्षेत्रात अशाप्रकारच्या खेळ््या केल्या आहेत. या माध्यमातून महापालिका क्षेत्रावर वर्चस्व मिळविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा काही कालावधिपुरतीच यशस्वी झाली होती.

Web Title: A New Story of Verticalism Under Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.