नवी अस्पृश्यता दूर झाली पाहिजे

By admin | Published: January 18, 2016 12:03 AM2016-01-18T00:03:59+5:302016-01-18T00:34:17+5:30

गिरीश कुलकर्णी : शांतिनिकेतनच्यावतीने ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान

New untouchability should have gone away | नवी अस्पृश्यता दूर झाली पाहिजे

नवी अस्पृश्यता दूर झाली पाहिजे

Next

सांगली : एकीकडे आपण चंद्रावर पोहोचल्याच्या गप्पा मारत असतानाच, कुपोषणाने होणारे लक्षावधी मृत्यू आपली मर्यादा दाखवून देत आहेत. सुधारणेच्या गप्पा होत असताना, एचआयव्ही बाधितांवर उपचार करण्यास अनेक डॉक्टर कचरतात हेसुद्धा वास्तव आहे. त्यामुळे २१ व्या शतकातील ही नव्याने निर्माण झालेली अस्पृश्यता दूर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी रविवारी केले.
येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भावनिक एकात्मतेचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्याहस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी बोलत होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले की, एकीकडे शहरात मोकळा श्वास घेणे मुश्किल होऊन बसले असताना, माणसातील संकुचितपणाही वाढत आहे. समाजात शिक्षण वाढत चालले असताना, शहाणपणा कमी होत चालल्याने, यात जर बदल घडवायचा असेल, तर माणूस बदलला पाहिजे. शिकलेल्या, स्वत:जवळ ज्ञान असलेल्या व्यक्तींनी आता तुटत चाललेला हा संवाद जोडणे आवश्यक असून, यासाठी चांगल्या समाजाच्या निर्मितीचे दायित्व प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे. देशात होत असलेल्या बदलामुळे समाज एकीकडे प्रगतीपथावर चालला असल्याचा भास निर्माण करण्यात येत आहे. त्याचे चांगले-वाईट परिणामही दिसून येऊ लागले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर वाढत चालला असताना, शहराकडील समाजाचा ओढाही वाढत चालला आहे. २०२० पर्यंत ६० टक्के जनता शहरी भागात असेल, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, त्यांच्या समस्यांतही वाढ झाली असेल. झोपडपट्टीचे मोठे जाळे निर्माण होत असून, गुप्तरोग, एड्स, बालकामगार, शोषण, व्यसनाधीनतेबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करायला कोणच तयार नाही. हे भयावह आहे. ही विषमता दुर्लक्षित करून चालणार नाही, असे ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले की, ‘मी नाही, तर कोण’ आणि ‘आता नाही, तर कधी’ हे दोन शब्दच समाज परिवर्तन करणाऱ्या माणसांना घडवितात. आपल्या जगण्यात आशय प्राप्त होणारी व्यक्ती विनम्र असतात. त्यामुळे त्यांच्या हातून समाज परिवर्तनाचे काम घडते. परिवर्तनाची ज्याला तळमळ आहे, तो कार्यकर्ता सामाजिक कार्य करतो, तर मळमळ असणारा कार्यकर्ता केवळ हे बदल पाहतो, असेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. राज्यस्तरीय रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचेही बक्षीस वितरण यावेळी झाले.
स्वागत डॉ. अविनाश पाटील यांनी, तर प्रास्ताविक शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे सचिव सूर्यकांत पवार, वैभव नायकवडी, बी. आर. थोरात, डॉ. मोहन पाटील, शौकत मुलाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


कर्मयोगी पुरस्कारातून मिळालेल्या एक लाखाच्या रकमेतून कुडाळ येथील प्रकल्पाच्या जमिनीचे काम करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगत, या प्रकल्पास प्राचार्य पी. बी. पाटील यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेले शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थी, गौतम पाटील यांचे वर्गमित्र आणि सांगलीतील उद्योजक राजू शेख यांनी कुलकर्णी यांना पुरस्कारासाठीची रक्कम फौंडेशनच्या कामासाठी वापरण्याचे आवाहन करत कुडाळ येथील प्रकल्पासाठी स्वत:हून एक लाखाची देणगी जाहीर केली.


भेकडपणाही वाढतोय
समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना कमी होत असतानाच, शिकलेली पिढी वाढत असताना त्यातील शहाणपण कमी होत चालले आहे. आजकाल समाजातून देणगीदार मिळणे सोपे झाले असताना एखाद्या महत्त्वाच्या घटनेत आवश्यक असणारे साक्षीदार मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे समाजात शैक्षणिक प्रगती झाली असली, तरी समाजाचा भेकडपणाही वाढत चालला असल्याची खंत कु लकर्णी यांनी व्यक्त केली.

Web Title: New untouchability should have gone away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.