साखर उद्योगासाठी नवे हवामान अंदाज सूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:16 AM2019-04-05T00:16:41+5:302019-04-05T00:16:47+5:30
कोल्हापूर : भारतीय ऊस व साखर उद्योगासाठी हवामानाचा नेमका अंदाज सांगता यावा; त्यानुसार भावी दिशा ठरवता यावी यासाठी भारतीय ...
कोल्हापूर : भारतीय ऊस व साखर उद्योगासाठी हवामानाचा नेमका अंदाज सांगता यावा; त्यानुसार भावी दिशा ठरवता यावी यासाठी भारतीय साखर महासंघ नवे हवामान अंदाज सूत्र निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अमेरिकेतील एका जगप्रसिद्ध हवामान कंपनीशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली.
‘एल निनो’च्या प्रभावाबाबत भारतीय हवामान खाते व स्कायमेट या खासगी क्षेत्रातील हवामान अंदाज करणाऱ्या संस्थांमध्ये मतभिन्नता आहे. पॅसिफिक क्षेत्रातील हवा, तापमान व एकूण परिस्थितीमध्ये होणाऱ्या सततच्या बदलांमुळे ही संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
त्यावर एकूणच व विशेषत: ऊस पिकाखालील क्षेत्र, उसाची उत्पादकता, उसाचे उत्पन्न, साखरेचे उत्पन्न, उभ्या उसावरील रोग- किडीची अवस्था याबाबत अचूक निदान करण्याची उच्च रिझ्युल्येशन आधारित अद्ययावत तंत्रज्ञान आय.बी.एम. या जगप्रसिद्ध संगणक उद्योगांतर्गत कार्यरत असणाºया हवामान कंपनीसोबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या स्तरावरून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे आणि त्याआधारे ‘हवामान अंदाज सूत्र’ निश्चित होण्यात यश आल्यास ते भारतीय ऊस व साखर उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे नाईकनवरे यांनी सांगितले.
देशात २८८ लाख टन गाळप
दरम्यान, २५ मार्चपर्यंत देशात जवळपास २८८.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्रात सर्वांत जास्त म्हणजे १०३.६० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशचा क्रमांक असून तेथे ९०.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू साखर हंगामात देशभरात ३२४ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. देशातील एकूण ५३५ साखर कारखान्यांपैकी ३१३ कारखान्यांत आजमितीला गाळप सुरू असून त्यातून २६६१.६७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात ९२५ लाख टन तर उत्तर प्रदेशात ८०२.२१ लाख टन उसाचे गळीत झाले.