‘गोकुळ’कडून नववर्षाची भेट
By admin | Published: December 25, 2016 12:04 AM2016-12-25T00:04:03+5:302016-12-25T00:04:03+5:30
म्हशीच्या दूध खरेदी दरात रुपयाची वाढ : वासरू संगोपन, संगणक अनुदानात वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) १ जानेवारीपासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया दरवाढ केली आहे. राज्यात ‘गोकुळ’चा दूध खरेदी दर सर्वाधिक आहे. वासरू संगोपन, संगणक, वैरण विकास अनुदानातही भरघोस वाढ करून संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती
संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. गुणवत्ता व चवीमुळे ‘गोकुळ’च्या दुधाला बाजारपेठेत मागणी वाढत आहे. मुंबई बाजारपेठेत वार्षिक २३ कोटी ५७ लाख लिटर (रोज सहा लाख ४६ हजार लिटर) म्हणजेच एकूण दुधाच्या ६३ टक्के दुधाची विक्री होते. एकूण दूध विक्रीच्या ८७ टक्के दूध मुबंई, पुणे, कोल्हापूर, गोवा व कोकणात विक्री होते. उर्वरित १३ टक्के दूध दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरले जाते; पण म्हैस दुधाची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असून, तुलनेने गायीचे दूध वाढले आहे. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी १ जानेवारीपासून खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ केली आहे. त्याचबरोबर
जातिवंत जनावरांची पैदास होण्यासाठी सुरू असलेल्या वासरू संगोपन योजनेच्या अनुदानात वाढ केली. पूर्वी म्हशीच्या पहिल्या वेतासाठी सरसकट ७५०० रुपये, तर दुसऱ्या वेतासाठी साडेचार हजार रुपये अनुदान दिले जात होते. आता १ जानेवारीपासून जन्मास आलेल्या मुऱ्हा, मेहसाना व जाफराबादी म्हैस वासरासाठी, तर गीर, साहिवाल, देवणी व थारपारकर देशी गायीसाठी अनुदानात वाढ केली आहे. संस्थांना संगणक खरेदीसाठी २० हजार, तर एक हजार ब्रॉड बॅँड कनेक्शन खर्चासाठी अनुदान दिले जाणार आहे. ज्या संस्थांनी दहा वर्षांपूर्वी संगणक अनुदान घेतले आहे, त्यांना दुबार खरेदी अनुदान देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. मिल्को टेस्टर रोखीने खरेदी करणाऱ्या संस्थांना ११ हजार, तर क्रेडिटवर खरेदी करणाऱ्यांना ४७०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. कोणत्याही कंपनीचा हायड्रोपोनिक सेट खरेदी केल्यास प्रतिदिनी ५० किलोपर्यंत हिरवा चारा उत्पादन करणाऱ्या सेटसाठी पाच हजार व १०० किलोपर्यंत हिरवा चारा उत्पादन करणाऱ्या सेटसाठी दहा हजार अनुदान देणार आहे.
शासनाच्या दरापेक्षा साडेचार रुपये प्रतिलिटर ‘गोकुळ’चा दर जादा असून, राज्यातील उर्वरित संघांपेक्षाही दर आघाडीवर असल्याचेही विश्वास पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पशुसंवर्धन सेवेतही सवलत!
संस्थांच्या दूध बिलातून १९९२ पासून पशुसंवर्धन निधीसाठी प्रतिलिटर ५ पैसे कपात केली जात होती. ही कपात १ जानेवारीपासून बंद केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
असा मिळणार उत्पादकाला दर
फॅटमिळणारा दर
६.५३८ रुपये