नववर्षाची विधायक सुरुवात
By admin | Published: January 2, 2016 08:29 AM2016-01-02T08:29:33+5:302016-01-02T08:33:36+5:30
विविध कार्यक्रमांचे आयोजन : ‘थर्टी फर्स्ट’सह नववर्षाचे जल्लोषात स्वागत
कोल्हापूर : गड-किल्ल्यांची साफसफाई मोहीम, रक्तदान शिबिर, दीपोत्सव, ‘रन फॉर पीस दौड’ अशा सामाजिक, विधायक उपक्रमांनी शुक्रवारी शहरवासीयांनी नववर्षाचे स्वागत केले. ‘सुख, समृद्ध आणि भरभराटीचे नववर्ष जावो,’ अशा विविध शुभेच्छांच्या देवाणघेवाणीत अनेकांचा २०१६ या नव्या वर्षातील पहिला दिवस सरला.
‘थर्टी फर्स्ट’निमित्त गुरुवारी शहरातील उद्याने रात्री बारापर्यंत खुली होती. अनेकांनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणीसमवेत या उद्यानांसह रंकाळा आणि पंचगंगा नदीघाटावर सहभोजनाचा आस्वाद घेतला. शहरातील विविध हॉटेल्स्, क्लबमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘थर्टी फर्स्ट’सह नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रंगला होता. नव्या वर्षाचे पहिल्या दिवसाची सकाळी शुभेच्छांचा वर्षावामध्ये उजाडली. प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवरून एकमेकांना शहरवासीय शुभेच्छा देत होते. व्हॉटस्अॅप, हाईक, फेसबुक या मीडियावर संदेशांची गर्दी झाली होती. बहुतांश नागरिकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईसह अन्य मंदिरांमध्ये देवदर्शन करून दिवसाची सुरुवात केली. ‘थर्टी फर्स्ट’ दिवशी मार्गशीर्ष गुरुवार होता. त्यामुळे शुक्रवारी अस्सल कोल्हापुरी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. काही संस्थांनी नववर्षाच्या स्वागताला सामाजिक, विधायक उपक्रमांची जोड दिली. जागतिक शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी सिटिझन फोरमतर्फे ‘रन फॉर पीस’ दौड आयोजित केली होती. एस्तेर पॅटर्न स्कूलच्या मैदानावर ख्राईस्ट चर्चसभोवती सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत दौड काढण्यात आली. यावेळी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आदी धर्माच्या मंदिरात जाऊन विश्वशांती, जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली. त्यात ख्राईस्ट चर्च, यंग मेन ख्रिश्चन असोसिएशन, वॉलिटीअर फॉर बेटर इंडिया, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण, सचिव रवींद्र जानकर, शाहूपुरी बडी मस्जिदचे अध्यक्ष फारूख कुरेशी, सचिन शानबाग, आप्पा लाड, मिलिंद वानखेडे, रोहित शिंदे, नगरसेवक विजय खाडे, चेतन चौधरी, जयदीप शेळके, प्रसाद जाधव, सनी शिंदे, संग्राम कौलवकर-पाटील, अजिंक्य रूकडीकर, उमेश भोसले, शाहरूख अत्तार, महमंद अतुरकर, पार्थ वणकुद्रे, अतुल पाटणे, गजानन कोल्हे, हर्षवर्धन कामत, आदी सहभागी झाले होते. कोल्हापूर हायकर्स ग्रुपतर्फे गडकिल्ल्यांच्या साफसफाईची मोहीम राबविण्यात आली. रुईकर कॉलनीत वीर सेवा दलातर्फे रक्तदान शिबिर, तर शिवसंस्कार प्रतिष्ठानतर्फे मोहिते कॉलनीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यासह श्री स्वामी समर्थ मंदिरात दीपोत्सव करण्यात आला. कवी संतोष जाधव यांची ‘संस्कृतीच्या भूमीवर’ ही काव्यमैफल रंगली. (प्रतिनिधी)
‘डोनेट अ बुक’चा प्रारंभ
एक पुस्तक एखाद्याचे आयुष्य बदलू शकते हा विचार घेऊन थिएटर रिसोर्सतर्फे शुक्रवारी ‘डोनेट अ बुक’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
या अभियाना अंतर्गत ३१ जानेवारी दरम्यान दान स्वरूपात मिळालेली पुस्तके कोल्हापुरातील समर्थ विद्यामंदिर आणि नागपूरमधील अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलला देण्यात येणार आहेत.
या अभियानासाठी खरी कॉर्नर येथील लक्ष्मी मंगल कार्यालय, मिरजकर तिकटी येथील देवयानी कॉम्प्युटर्स आणि शाहूपुरीतील एकबोटे फर्निचर्स येथे पुस्तके जमा करता येतील, अशी माहिती थिएटर रिसोर्सचे संचालक कौस्तुभ बंकापुरे यांनी दिली.
२०१६ मध्ये सगळे
आले का?
‘सगळे आले का रे २०१६ मध्ये? कुणी राहिलं तर नाही ना मागे’, असे गमतीदार संदेशासह हॅपी न्यू ईअर, नवीन वर्ष आपणास सुख-समाधान, आनंद, ऐश्वर्य, आरोग्याचे जावो, जागतिक नववर्षाभिनंदन अशा शुभेच्छा संदेशांचा दिवसभर व्हॉटस्-अॅप, फेसबुकवर वर्षाव सुरू होता.