महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा नववर्षाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:02+5:302021-01-02T04:21:02+5:30
काेल्हापूर : नवीन वर्षात महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा संकल्प शुक्रवारी काही पक्षांच्या नेत्यांनी केला. सोशल मीडियावर अशाप्रकारचे संदेशही व्हायरल ...
काेल्हापूर : नवीन वर्षात महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा संकल्प शुक्रवारी काही पक्षांच्या नेत्यांनी केला. सोशल मीडियावर अशाप्रकारचे संदेशही व्हायरल झाले. याचबरोबर इच्छुकांनी फोन करुन, हस्तपत्रकाद्वारे मतदारांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. प्रत्येक प्रभागात हेच चित्र पाहण्यास मिळाले.
महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे. नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. इच्छुकांकडूनही विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदारांपर्यंत पाेहोचण्याची ते संधीच शोधत आहेत. शुक्रवारी नूतन वर्षारंभाचा फायदा घेत इच्छुकांनी मतदारांशी संपर्क साधला. त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. काही पक्षांच्या नेत्यांनी यावर्षीचा संकल्प महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकविण्याचा असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले. काही इच्छुकांनी प्रभागातील सर्व घरांमध्ये स्वत:चे छायाचित्र असलेल्या दिनदर्शिकांचे वाटप केले. काहींनी नूतन वर्षानिमित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्डसाठी नोंदणी अभियान सुरू केले.
शुभेच्छांचा ‘ऑडिओ’ संदेश
प्रत्येक प्रभागात सुमारे सहा ते सात हजार मतदार आहेत. या सर्वांपर्यंत पोहोचून त्यांना शुभेच्छा देणे शक्य नसते. त्यामुळे शुभेच्छांचा ऑडिओ तयार करत प्रभागातील सर्व मतदारांना मोबाईलवरून हा शुभेच्छांचा ऑडिओ संदेश पाठविला. काहींनी तर प्रभागातील मान्यवर व्यक्तींची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
प्रभागाच्या विकासासाठी रिंगणात
प्रत्येक प्रभागात सुमारे सहा ते सात हजार मतदार आहेत. या सर्वांना आपण निवडणुकीला उभे असल्याचे समजावे, यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह आपले छायाचित्र असणारे संदेश समर्थकांच्या मदतीने सर्वत्र व्हायरल केले जात आहेत. काहींनी तर प्रभागात फोटोही लावले आहेत. प्रभागाच्या विकासासाठी तत्पर असून, महापालिकेच्या रिंगणात उतरलो असल्याचे यामध्ये म्हटले आहे. यामध्ये काहींनी थेट मोबाईलवर फोनही केले.