ऊसाच्या फडात आढळली कोल्ह्याची नवजात पिल्ले, कोल्हापूरच्या वनविभागाने सुखरुप पोहचवले आईच्या कुशीत
By संदीप आडनाईक | Published: December 9, 2022 07:15 PM2022-12-09T19:15:06+5:302022-12-09T19:15:40+5:30
पिल्लांना आईपर्यंत पोहोचवणे वन विभागासाठी एक मोठे आव्हान होते
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावात गुरुवारी राहुल पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना आढळलेल्या कोल्ह्याच्या सहा नवजात पिल्लांना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास वन्यजीव विभागाच्या बचाव पथकाने त्यांच्या आईपर्यंत पोहोचविले आणि ती सहा पिल्ले आईच्या कुशीत सुखरूप धावली.
भेंडवडेमध्ये राहुल पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना ही कोल्ह्याची पिल्ले आढळली. त्यांनी तत्काळ खोची गावचे प्राणिमित्र तेजस जाधव यांच्याशी संपर्क साधून वनविभागाला याची माहिती दिली. करवीर वनपरिक्षेत्रधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वन्यजीव बचावपथक घटनास्थळी दाखल झाले.
कोल्ह्याची ही नवजात पिल्ले २५ ते ३० दिवसांची असल्याने त्यांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवणे वन विभागासाठी एक मोठे आव्हान होते. कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम तसेच उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचावपथकाने एका रात्रीत ही सहा पिल्ले त्यांच्या आईजवळ पोहोचवली. या पिल्ले जिथे होती त्याच्या जवळच्या परिसरात त्यांची आईही होती. त्यामुळे तिला शोधणे शक्य झाले.