ज्येष्ठांच्या वर्णीने नवोदित नाराज
By admin | Published: April 29, 2015 11:34 PM2015-04-29T23:34:51+5:302015-04-30T00:23:27+5:30
जिल्हा बँक निवडणूक : दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील इच्छुक प्रचारापासून दूर
सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीचा ताळेबंद करताना ज्येष्ठांचीच वर्णी जमा बाजूस झाल्याने, वजावट झालेल्या नवोदितांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेत संधीची अपेक्षा ठेवली होती. ऐनवेळी ज्येष्ठांनीच त्यावर कब्जा केल्याने युवक कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहू लागले आहेत.
राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षांचे नेते दोन पॅनेलमध्ये विभागले गेले आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये तीस टक्के उमेदवार यापूर्वी बँकेत अनेकदा काम केलेले अनुभवी आहेत.
यातील बहुतांश उमेदवारांची नावे गैरव्यवहार प्रकरणातही समाविष्ट आहेत. त्यांच्या चौकशीचे काम सुरू आहे. ज्येष्ठांसह नेत्यांच्या नातलगांनाही उमेदवारी दिली आहे. त्यांची गोळाबेरीज केली, तर हा आकडा ५0 टक्क्याच्या घरात जातो. त्यामुळे नवोदितांना या पॅनेलमध्ये म्हणावी तशी संधी मिळाली नाही. तीन ते चार ठिकाणी नवोदित व दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळाली.
काँग्रेसच्या १७ जणांच्या पॅनेलमध्ये तुलनेते ज्येष्ठांची संख्या कमी असली तरी, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील अनेक उमेदवारांना गाफीलपणे अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याने त्यांना निवडणुकीत उतरता आले नाही. असे अनेक लोक नाराज आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचाही यात समावेश होतो. राष्ट्रवादी व भाजप नेत्यांवर विसंबून राहिल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे शेवटच्या दोन नियोजनाच्या बैठकांना पृथ्वीराज पाटील अनुपस्थित राहिले.
त्यांच्यासह काँग्रेसमधील अनेक उमेदवार, अर्ज मागे घ्यावे लागल्याने नाराज आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असूनही उसने उमेदवार घेण्याची वेळ काँग्रेसप्रणित पॅनेलवर आली आहे. उमेदवारांचा हा ताळेबंद बिघडल्याने नाराजीचा तोटा सर्वच पक्षांना अनुभवावा लागण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी
जिल्हा बँकेसाठी ज्येष्ठांसह नेत्यांच्या नातलगांनाही उमेदवारी दिली आहे. हा आकडा ५0 टक्क्याच्या घरात जातो. त्यामुळे नवोदितांना या पॅनेलमध्ये जादा संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत.