नवनिर्वाचित सदस्य नेत्यांच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:43+5:302021-02-07T04:22:43+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांना देवदर्शनासह अलिशान हॉटेलवर ...
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांना देवदर्शनासह अलिशान हॉटेलवर बडदास्त केली जात आहे. सरपंच आरक्षणानंतर फोडाफाेडीचे राजकारण उफाळून आले असून सदस्य फोडण्यासाठी साम, दाम, दंड सर्व नितीचा वापर सुरू आहे. त्यामुळे निवडीपर्यंत सदस्यांची मर्जी सांभाळताना स्थानिक नेत्यांची दमछाक उडाली आहे.
जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होऊन तिथे नवनिर्वाचित सदस्यांची निवड झाली आहे. या सदस्यांमधून मंगळवारी (दि. ९) सरपंच व उपसरपंच निवडी होणार आहेत. बहुतांशी गावात काठावरचे बहुमत असल्याने निवडणूक झाल्यापासून सदस्य फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे सदस्यांना सांभाळताना स्थानिक नेत्यांना कसरत करावी लागत आहे. सरपंच आरक्षणानंतर तर गावातील राजकारणाने चांगलीच उसळी घेतली आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही गटाकडून साम, दाम, दंड या नितीचा सर्रास वापर केला जात आहे. राजकीय दबाव टाकून फोडाफोडी केली जात आहे. स्थानिक पातळीवरील सदस्यांचे कच्चे दुवे शोधून त्याचाही वापर त्यांचे मन वळवण्यासाठी सुरू आहेत.
या सगळ्या वातावरणापासून सदस्यांना दूर ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी त्यांना आपल्या नजरकैदेत ठेवले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सदस्य सहलीसाठी बाहेर पडले आहेत. गोवा, रत्नागिरी, महाबळेश्वर, शिर्डी येथे सदस्यांना हलवले आहे. त्यांचा विरोधी गटाशी संपर्क होऊ नये, यासाठी एक यंत्रणा गाडीत ठेवली आहे. त्यांना काय हवे, काय नको, हे सगळ्याची पूर्तता केली जाते. सोमवारी रात्री कोल्हापूरात आणून मंगळवारी सरपंच निवडी दिवशी थेट ग्रामपंचायत सभागृहातच सदस्यांना आणण्याचे नियोजन अनेक गावात आहेत.
आमदार, खासदारांचाही हस्तक्षेप
ग्रामपंचायतीच्या निवडणूक स्थानिक गटातटातच झाल्या. लोकसभा, विधानसभेला एकत्र असणारे गट एकमेकांसमोर उभा टाकले. बहुमताचा आकडा गाठताना पुन्हा गटतट एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून थेट आमदार, खासदारांचाही हस्तक्षेप सुरू झाल्याने अनेक गावात पेच निर्माण झाला आहे.
जेवणावळी, प्रलोभने आणि आणाभाका
निकाल लागल्यापासून सदस्यांना खूष ठेवण्यासाठी रोज जेवणावळी सुरू आहेत. रात्री धाब्यावरचे चमचमीत जेवणाबरोबरच इतरही प्रलोभने दिली जात आहेत. त्यातूनही कोणी फुटू नये, यासाठी आणाभाकाही घेतल्या जात आहेत. ग्रामदैवतांचा भंडारा, गुलाल उचलून शपथीही अनेक ठिकाणी घेतल्या आहेत.