आर्थिक फसवणूक; व्हनगुत्ती येथील नवदाम्पत्याने संपवले जीवन, मित्रांनी फोन लोकेशनवरुन शोधले ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:03 PM2023-07-28T12:03:25+5:302023-07-28T12:03:42+5:30

चार महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

Newlyweds from Vangutti ended their lives, friends found the place from phone location in kolhapur | आर्थिक फसवणूक; व्हनगुत्ती येथील नवदाम्पत्याने संपवले जीवन, मित्रांनी फोन लोकेशनवरुन शोधले ठिकाण

आर्थिक फसवणूक; व्हनगुत्ती येथील नवदाम्पत्याने संपवले जीवन, मित्रांनी फोन लोकेशनवरुन शोधले ठिकाण

googlenewsNext

चुये : व्हनगुत्ती (ता. भुदरगड) येथील नवदाम्पत्याने इस्पुर्ली (ता. करवीर) गावच्या हद्दीत शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल राजाराम परीट (वय २३), अनुष्का राहुल परीट (२१, रा. व्हनगुत्ती, ता. भुदरगड) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे असून, ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, व्हनगुत्ती येथील राहुल परीट यांचा चार महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. राहुल व पत्नी अनुष्का हे वाळवे (ता. राधानगरी) येथे पाहुण्याच्या घरी जातो असे सांगून गेले होते. वेळेत घरी राहुल आला का नाही म्हणून नातेवाइकांनी फोन लावला असता उचलला नाही. बराच वेळ प्रयत्न करून उचलला नसल्यामुळे त्यांनी व मित्रांनी फोन लोकेशनद्वारे प्रयत्न केला असता त्यांना इस्पुर्ली येथील लोकेशन दाखवले.

नातेवाईक व मित्र इस्पुर्लीत आले असता, कोल्हापूर-गारगोटी मार्गावर एक जनावरांचे शेड लोकेशनमध्ये दिसले. त्यांनी शेडचा दरवजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, आतून बंद होता.
दरवाजा मोडून आत प्रवेश केला असता, राहुल व अनुष्का यांनी छत्ताच्या लोखंडी पाईपला गळफास लावून घेतला होता. राहुल याने साडीच्या कपड्याने तर अनुष्काने ओढणीने गळफास लावला असल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी जवळील इस्पुर्ली पोलिस ठाण्याशी संपर्क करून मृतदेह खाली उतरवले असता, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखले केले होते. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली असून मयत राहुल यांचे चुलते दत्तात्रय परीट यांनी फिर्याद दिली. राहुल व अनुष्का यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. राहुल हे एमएसईबी खात्यात कंत्राटी कामगार म्हणून आऊट सोर्सचे काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.

आर्थिक फसवणूक 

घटनास्थळी इस्पुर्ली पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत आपली आर्थिक फसवणूक झाली असल्यामुळे आपण व पत्नी आत्महत्या करत असल्याचे मजकूर असल्याचा घटनास्थळी बोलले जात होते.

Web Title: Newlyweds from Vangutti ended their lives, friends found the place from phone location in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.