अर्भके टाकल्याच्या वृत्ताने उडाली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 06:15 PM2020-09-17T18:15:52+5:302020-09-17T18:46:39+5:30
कोल्हापूर येथील रिंगरोडवरील विश्वपंढरी कार्यालयाच्या शेजारी फुटपाथवर खाकी कागदाच्या बॉक्समध्ये कुणीतरी दोन अर्भके टाकल्याच्या वृत्ताने गुरुवारी दुपारी खळबळ उडाली. पोलिसांनी प्रत्यक्षात जावून खात्री केली असता त्या बॉक्समध्ये कुत्रीची काढून टाकलेली वार व त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली कुत्र्याची सहा अर्भक दिसून आली.
कोल्हापूर : येथील रिंगरोडवरील विश्वपंढरी कार्यालयाच्या शेजारी फुटपाथवर खाकी कागदाच्या बॉक्समध्ये कुणीतरी दोन अर्भके टाकल्याच्या वृत्ताने गुरुवारी दुपारी खळबळ उडाली. पोलिसांनी प्रत्यक्षात जावून खात्री केली असता त्या बॉक्समध्ये कुत्रीची काढून टाकलेली वार व त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली कुत्र्याची सहा अर्भक दिसून आली.
घडले ते असे : फुटपाथवरच हा बॉक्स कुणीतरी टाकून दिला होता. या मार्गावरून कायमच वाहनचालकांची वर्दळ असते. पडलेल्या बॉक्समध्ये बाहेरून अर्भकासारखेच कांहीतरी दिसत असल्याने ते पाहून लोकांची तिथे गर्दी झाली. ही माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवण्यात आली.
तातडीने पोलिस व विविध वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामनसह माध्यम प्रतिनिधींचा गराडा पडला. त्याच परिसरात असलेल्या जिल्हा पशुचिकित्सलायातील डॉ. शाम सुद्रिकही तिथे आले. त्यांनी बॉक्स नीट उघडून पाहिला असता त्यामध्ये कुत्रीचा काढून टाकलेला गर्भ व सहा पूर्ण वाढ झालेली पिल्ली मृतावस्थेत होती.
मुळ मादी कुत्री जातीवंत असू शकते परंतू तिला झालेली पिल्ले जातीवंत नव्हती. त्यामुळे कुणीतरी ही पिल्ले काढून टाकली असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. ती तशीच बॉक्समध्ये घालून ती रस्त्याच्याकडेला आणून टाकली होती. त्यामध्ये रक्ताने माखलेली छोटी कात्रीही होती. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली.